जिल्हा बँकेसाठी २०११ संस्थांचे ठराव; भाजपची आघाडी, सर्वाधिक सोसायट्यांचा समावेश

दैनिक स्थैर्य | दि. ६ ऑगस्ट २०२६ | सातारा |
जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी बुधवारी सहा मतदारसंघातून २०११ ठराव दाखल झाले. अखेरच्या दिवशी हातगेघर सोसायटीचा ठराव रद्द झाला. माण तालुक्यातील पळशी सोसायटीत राष्ट्रवादी काँग्रेसने बाजी मारली. एकूण मतदारसंख्येच्या ४०६ ठराव कमी झाले आहेत. या ठरावामध्ये भारतीय जनता पक्षाची आघाडी दिसत आहे.

सोसायटी मतदारसंघातून सर्वाधिक ९५८ ठरावांचा समावेश आहे. खरेदी-विक्री संघ, कृषी प्रक्रिया मतदारसंघाचे शंभर टक्के ठराव झाले. आता या ठरावांची माहिती जिल्हा बँकेकडे पाठवली जाईल. त्यांची यादी तयार करून ती विभागीय सहनिबंधकांकडे पाठविली जाणार असून, त्यानंतर कच्ची मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे.

जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी विविध सहा मतदारसंघांतून मतदार प्रतिनिधी निवडण्याची ठराव प्रक्रिया सुरू होती. आज ठराव करण्याचा अखेरचा दिवस होता. त्यासाठी इच्छुकांनी आपापल्या मर्जीतल्या प्रतिनिधींचे ठराव करण्यावर भर दिला होता. त्यामुळे अनेक ठिकाणी भाजप व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांत वादाचे प्रसंग झाले.

हातगेघर सोसायटीचा ठराव रद्द

हुमगाव जिल्हा मध्यवर्ती बँकेसाठी हातगेघरसह सहा गाव पंचक्रोशी सोसायटीचा ठराव अनेक नाट्यमय घडामोडीनंतर अखेर रद्द झाला. ठरावावर चर्चा करण्यासाठी बोलावलेल्या आजच्या सोसायटी सभेला नऊपैकी दोनच संचालक उपस्थित राहिल्याने कोरमअभावी ही सभा तहकूब करण्याची नामुष्की ओढावली. जिल्हा परिषद सदस्य वसंतराव मानकुमरे हे स्वतः याठिकाणी संचालक असल्याने या सोसायटीच्या ठरावाला महत्त्व प्राप्त झाले होते. हातगेघरसह कावडी, विवर, पानस, आखेगणी व सायघर या सहा गावांची मिळून ही सोसायटी आहे.

अखेरच्या दिवशी या सोसायटीची जिल्हा बँकेसाठी ठरावाची प्रक्रिया पार पडणार होती. यापूर्वी आलेवाडी व आखाडे सोसायटीत झालेल्या दोन्ही बाजूंच्या समर्थकांच्या गोंधळामुळे पोलिस प्रशासन अलर्ट मोडवर होते. खबरदारीचा उपाय म्हणून रात्रीच हातगेघर परिसरात जमावबंदीचा आदेश लागू करण्यात आला होता. त्यामुळे हातगेघर गावाला पोलिस छावणीचे स्वरूप आले होते.

Back to top button
Don`t copy text!