लोणंद: २ कोटींचा अवैध मद्यसाठा जप्त – राज्य उत्पादन शुल्काची मोठी कारवाई

राज्य उत्पादन शुल्काच्या पथकाने लोणंद येथे प्लास्टिक सिरॅमिकच्या आड लपवून नेला जाणारा तब्बल दोन कोटी रुपयांचा परराज्यातील अवैध मद्यसाठा जप्त केला आहे.

स्थैर्य, लोणंद, दि. २२ जून : सातारा-निरा रोडवरील लोणंद बस स्टँड समोर राज्य उत्पादन शुल्काच्या कोल्हापूर आणि सातारा भरारी पथकाने संयुक्त कारवाई करत २ कोटी ९४ हजार ३२० रुपयांचा अवैध मद्यसाठा आणि १४ चाकी ट्रक जप्त केला आहे. या कारवाईत प्लास्टिक सिरॅमिकच्या गोण्यांच्या आडून चोरट्या मार्गाने वाहतूक केली जात असलेला परराज्यातील मद्यसाठा हस्तगत करण्यात आला असून एका संशयित आरोपीला अटक करण्यात आली आहे.

राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे लोणंद येथे सापळा रचण्यात आला होता. यावेळी संशयित अशोक लेलँड कंपनीचा १४ चाकी ट्रक थांबवून त्याची तपासणी करण्यात आली. या ट्रकमध्ये प्लास्टिक सिरॅमिकच्या १५० गोण्यांच्या मागे गोवा आणि मध्य प्रदेश राज्यात विक्रीसाठी असलेला विदेशी मद्यसाठा लपवला असल्याचे उघडकीस आले.

या कारवाईत ‘पोलंड प्राईड व्हिस्की’चे ८३४ बॉक्स आणि ‘रॉयल CLASSIC माल्ट व्हिस्की’चे ६७२ बॉक्स असे एकूण १५०६ बॉक्स जप्त करण्यात आले. या जप्त केलेल्या मद्याची बाजारपेठेतील किंमत १ कोटी ७१ लाख ४ हजार ३२० रुपये आहे. मद्यसाठ्यासह ट्रक आणि इतर मुद्देमाल असा एकूण २ कोटी ९४ हजार ३२० रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे.

या प्रकरणी संशयित आरोपी महमद शफीक रशिद शहा (वय ३९, रा. आझाद नगर, इंदूर, मध्य प्रदेश) याला अटक करण्यात आली असून त्याच्याविरुद्ध दारूबंदी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यात आंतरराज्यीय टोळी कार्यरत असण्याची शक्यता असून पुढील तपास दुय्यम निरीक्षक योगेश फटांगरे करत आहेत.

ही कारवाई आयुक्त राजेश देशमुख, सह आयुक्त प्रसाद सुर्वे, उप-आयुक्त विजय चिंचाळकर आणि सातारा अधीक्षक बाबासाहेब भुतकर यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक किरण पवार, माधव चव्हाण, सुहास शिरतोडे, अजय पाटील, विनय मरोड, कैलास छत्रे तसेच जवान विनोद हिंगणे, अजीत रसाळ, नरेंद्र कलकुटगी, सुरेश आव्यागिरी, आबासाहेब जानकर, अमित घाडगे, जीवन शिर्के, मारुती पोवार, विशाल आळतेकर आणि योगेश शेलार यांच्या पथकाने केली.

Back to top button
Don`t copy text!