धुळदेव: पावसाळ्यात पाणी साचण्याची वाढली चिंता – उपाययोजना सुरू

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा

फलटण-आसू रस्त्याच्या वाढलेल्या उंचीमुळे धुळदेवमध्ये पाणी साचण्याची चिंता वाढली आहे. सचिन अभंग यांच्या पुढाकाराने तात्पुरत्या उपाययोजना सुरू झाल्या आहेत.

स्थैर्य, धुळदेव, दि. २२ जून : फलटण तालुक्यातील धुळदेव येथे नव्याने बांधण्यात आलेल्या फलटण-आसू काँक्रीट रस्त्याची उंची वाढल्याने पावसाळ्यात पाणी साचण्याची मोठी चिंता निर्माण झाली आहे. या समस्येवर पंचायत समिती सदस्य सचिन अभंग यांच्या पुढाकाराने चारी खोदणे आणि पाईप टाकण्याच्या तात्पुरत्या उपाययोजनांना प्रत्यक्ष सुरुवात करण्यात आली आहे.

फलटण-आसू मार्गावरील रस्त्याची उंची सुमारे चार ते साडेचार फूट वाढली आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना गटारांची व्यवस्था न झाल्याने धुळदेव हे गाव गटार सुविधेपासून वंचित राहिले. यामुळे आगामी पावसाळ्यात पाण्याचा निचरा न झाल्यास श्री धुळदेव मंदिर परिसर आणि नागरिकांच्या घरांमध्ये पाणी शिरण्याची भीती निर्माण झाली आहे. मालमत्तेचे नुकसान टाळण्यासाठी ग्रामस्थांकडून तातडीच्या उपाययोजनांची मागणी होत होती.

या गंभीर प्रश्नावर पंचायत समिती सदस्य सचिन अभंग यांनी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि आमदार सचिन पाटील यांच्याकडे पाठपुरावा करून गटार बांधकामाचा कायमस्वरूपी प्रस्ताव पुढे नेला आहे. या कामास लवकरच मंजुरी मिळण्याची अपेक्षा आहे. दरम्यान, पावसाळा सुरू होण्यापूर्वीच राज इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीच्या यादव आणि पवार यांच्या मदतीने रस्त्यालगत चारी खोदणे आणि पाईप टाकण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.

यावेळी ग्रामस्थांनी सांडपाणी आणि मंदिर परिसरातील दिवाबत्तीची समस्या मांडली. स्थानिक प्रशासनाशी चर्चा करून हा प्रश्न सोडविणार असल्याचे सचिन अभंग यांनी स्पष्ट केले. आवश्यकता भासल्यास स्वखर्चाने दिवाबत्तीची व्यवस्था करणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली. या पाहणीसाठी सुभाष शिंदे, हेमंत गोरे, सचिन महामुनी, अनिकेत पवार, दीपक गोफणे, लालासाहेब गोफणे, आकाश पवार आणि गणेश वेदपाठक यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

Back to top button
Don`t copy text!