
दैनिक स्थैर्य | दि. १० ऑगस्ट २०२६ | सातारा |
कास धरण १०० टक्के भरल्याने सातारा पालिकेच्या वतीने परंपरेनुसार धरणाचे ओटीभरण करण्यात आले. धरणाची साठवण क्षमता पाच पटींनी वाढल्याने सातारा शहर आणि हद्दवाढ भागाला २४ तास पाणीपुरवठा करण्याचा पालिकेचा संकल्प असल्याची माहिती नगराध्यक्ष अमोल मोहिते आणि उपनगराध्यक्ष अॅड. दत्तात्रय बनकर यांनी दिली.
हजारो सातारावासीयांची तहान भागविणार्या कास धरणाचे दरवर्षी पालिकेकडून ओटीभरण केले जाते. रविवारी हा कार्यक्रम परंपरेनुसार पार पडला. यानंतर नगराध्यक्ष, उपनगराध्यक्षांनी माध्यमांशी संवाद साधला. सातारा पालिकेतील नगरसेविकांच्या हस्ते कास धरणातील पाण्याचे ओटीभरण करण्यात आले.
यावेळी नगराध्यक्ष अमोल मोहिते म्हणाले, खासदार उदयनराजे भोसले व मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या प्रयत्नांतून कास धरणाची उंची वाढविण्यात आल्याने साठवण क्षमता वाढली आहे. सध्या धरणात अर्धा टीएमसी पाणीसाठा उपलब्ध असून, शहराच्या पाणीपुरवठ्याला याचा मोठा आधार मिळणार आहे.
उपनगराध्यक्ष अॅड. दत्तात्रय बनकर म्हणाले, धरणाची क्षमता पाच पटींनी आहे. सध्या धरणातून शहराला सात ते आठ एमएलडी पाणी पुरवले जात आहे. नवीन जलवाहिनीमुळे ही क्षमता २१ एमएलडीपर्यंत पोहोचली आहे. त्यामुळे शहरासह वाढीव भागाला २४ तास पाणी देण्याचे नियोजन आहे.
या सोहळ्यास बांधकाम सभापती धनंजय जांभळे, शंकर किर्दत, अशोक शेडगे, नगरसेवक शंकर माळवदे, राजू, गोरे, नगरसेविका आशा पंडित, हेमलता भोसले व अधिकारी उपस्थित होते.