
नीरा खोऱ्यातील धरणांमध्ये मुबलक पाणीसाठा झाला असून भाटघर आणि वीर धरणे १०० टक्के भरली आहेत. वीर धरणातून नीरा नदीपात्रात ४ हजार ६३७ क्युसेक्सने विसर्ग सुरू आहे.
स्थैर्य, फलटण, दि. १० ऑगस्ट : फलटण तालुक्यासाठी वरदान ठरणाऱ्या नीरा प्रणालीतील धरणांमध्ये मुबलक पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. जलसंपदा विभागाच्या ताज्या अहवालानुसार भाटघर आणि वीर धरण १०० टक्के भरले आहे. तसेच नीरा देवघर धरण ९९ टक्क्यांच्या पुढे गेले असून वीर धरणातून नीरा नदीपात्रात पाण्याचा मोठा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.
धरणांमधील पाणीसाठ्याची सद्यस्थिती
जलसंपदा विभागाच्या आकडेवारीनुसार, भाटघर धरणात २३.५० टीएमसी आणि वीर धरणात ९.४१ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा जमा झाला असून ही दोन्ही धरणे शंभर टक्के भरली आहेत. नीरा देवघर धरणात ११.६५ टीएमसी म्हणजेच ९९.३५ टक्के साठा झाला आहे. गुंजवणी धरण ९०.०३ टक्क्यांवर पोहोचले असून त्यात ३.३२ टीएमसी पाणीसाठा उपलब्ध आहे. धोम बलकवडी प्रकल्प ९६.५८ टक्के भरला आहे.
नद्या आणि कालव्यांमध्ये विसर्ग
धरण क्षेत्रात समाधानकारक पाऊस झाल्याने धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. वीर धरणाच्या सांडव्यावरून नीरा नदीपात्रात ४ हजार ६३७ क्युसेक्स वेगाने पाणी सोडले जात आहे. तसेच उजव्या कालव्यात १ हजार ५५० क्युसेक्स, डाव्या कालव्यात ७५० क्युसेक्स आणि एस्केपद्वारे १ हजार १०० क्युसेक्स विसर्ग सुरू आहे. भाटघर धरणाच्या वीजगृहातून १ हजार २३६ क्युसेक्स पाणी सोडले जात आहे.