
दैनिक स्थैर्य | दि. १० ऑगस्ट २०२६ | कोल्हापूर |
‘राज्यातील प्रत्येक शेतकर्याला दिवसा मोफत वीज देण्याचे उद्दिष्ट असून, या वर्षाअखेर ९० टक्के आणि पुढील वर्षी १०० टक्के शेतकर्यांना दिवसा वीज उपलब्ध होईल,’ अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. शेतकर्यांना थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्रही देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
कागल येथे विविध विकासकामांच्या लोकार्पण सोहळ्यानिमित्त आयोजित शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. या वेळी राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण करण्यात आले.
राजर्षी शाहू महाराजांनी सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक क्रांती घडवून बहुजन समाजासाठी शिक्षण आणि रोजगाराची दारे खुली केली. त्यांचे कार्य आजही प्रेरणादायी असल्याचे फडणवीस म्हणाले.
शेतकरी कर्जमाफीचा निर्णय घेत ५६ हजार शेतकर्यांना लाभ देण्यात आला आहे. शेतकर्यांना मोफत वीज देण्यासाठी सरकार दर वर्षी २५ हजार कोटी रुपये खर्च करीत असून, ५८ हजार कोटी रुपयांची थकबाकीही सरकारने भरली आहे. सौर कृषी वाहिनी योजनेला गती दिल्याने सध्या ७४ टक्के शेतकर्यांना दिवसा वीज मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.
साखर उद्योगाच्या स्थैर्यासाठी इथेनॉल धोरण महत्त्वाचे असून, त्यामुळे ऊस उत्पादकांना एफआरपी देणे शक्य होत आहे. साखर कारखानदारीत ‘झीरो वेस्ट’ संकल्पनेतून ‘सीबीजी’ (कॉम्प्रेस बायोगॅस) व ‘सीएनजी’ची निर्मिती केली जाणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यात देशातील पहिला एकत्रित सीबीजी प्रक्रिया प्रकल्प उभारण्यात येणार असल्याची माहितीही फडणवीस यांनी दिली.
यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी शाहू महाराजांचे शेतकरी हिताचे कार्य आजही प्रेरणादायी असल्याचे सांगितले.
कार्यक्रमास विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, मंत्री हसन मुश्रीफ, चंद्रकांत पाटील यांच्यासह लोकप्रतिनिधी उपस्थित होते.