कराडात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, उदयसिंह पाटील-उंडाळकर यांच्यात चर्चा

दैनिक स्थैर्य | दि. १० ऑगस्ट २०२६ | सातारा |
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या तथा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि कराड दक्षिणचे नेते अ‍ॅड. उदयसिंह पाटील-उंडाळकर यांची रविवारी सकाळी कराडात भेट झाली. यावेळी त्यांच्यात काय बोलणे झाले, याची चर्चा राजकीय वर्तुळात सध्या सुरू आहे.

सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू होण्यापूर्वीच जिल्ह्यातील राजकारण तापू लागले आहे. बँकेच्या सत्तेच्या चाव्या कुणाच्या हातात जाणार? याची गणिते मांडली जात आहेत. अशातच या भेटीमुळे अनेक तर्क-वितर्क लढविले जात आहेत.

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या रविवारी कोल्हापूर दौर्‍यावर निघाल्या होत्या. कोल्हापूरकडे जात असताना त्यांनी अचानक कराडच्या शासकीय विश्रामगृहात पक्षाच्या पदाधिकार्‍यांशी काही मिनिटे चर्चा केली. यावेळी राष्ट्रवादी(अजित पवार)चे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सोळसकर, अ‍ॅड. उदयसिंह पाटील-उंडाळकर, कराड तालुकाध्यक्ष डॉ. सुधीर जगताप, कराड बाजार समितीचे माजी सभापती सुनील पाटील, कराड पंचायत समिती सदस्य नितीन थोरात, धनाजी पाटील, राजेश पाटील-वाठारकर, स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री पवार यांनी कार्यकत्यांसोबत चर्चा केल्यानंतर अ‍ॅड. उदयसिंह पाटील-उंडाळकर यांच्यासोबत त्यांची काही मिनिटे चर्चा झाली. या भेटीत नेमकी काय चर्चा झाली? यामागचे कारण समोर आले नसले तरी सध्या सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या भेटीला राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे.

Back to top button
Don`t copy text!