
दैनिक स्थैर्य | दि. १० ऑगस्ट २०२६ | गडचिरोली |
गडचिरोलीच्या धानोरा तालुक्यातील एका निवासी आश्रमशाळेत सर्पदंशाने तीन विद्यार्थिनींचा मृत्यू, तर तीन विद्यार्थिनी जखमी असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
विद्यार्थिनी जेवणानंतर झोपलेले असताना रात्री दोन ते अडीच वाजताच्या सुमारास विद्यार्थिनींना सर्पदंश झाल्याची घटना समोर आली. या घटनेनंतर विद्यार्थिनींना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, धानोरा रुग्णालयात उपचारादरम्यान इयत्ता सहावीतील आणि इयत्ता आठवीतील या दोन विद्यार्थिनींचा मृत्यू झाला. तर गडचिरोलीच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असताना इयत्ता दुसरीतील विद्यार्थिनीचाही मृत्यू झाला.
दरम्यान, इयत्ता पाचवीतील, सहावीतील आणि इयत्ता आठवीतील या तीन विद्यार्थिनींवर गडचिरोली जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यापैकी एका विद्यार्थिनीची प्रकृती अधिक गंभीर असल्याची माहिती समोर आली आहे.
