‘मिनी काश्मीर’ महाबळेश्वरमध्ये पावसाची डबल सेंच्युरी; पर्यटकांची तुफान गर्दी

दैनिक स्थैर्य | दि. १० ऑगस्ट २०२६ | सातारा |
यंदा दि. १ जून ते दि. ९ ऑगस्टअखेर महाबळेश्वरमध्ये पावसाची डबल सेंच्युरी झाली असून २०१.२५ इंच म्हणजेच ५१११.९ मिमी पावसाची नोंद झाली आहे. सध्या देश-विदेशातील पर्यटकांच्या गर्दीने महाबळेश्वर बहरून गेले आहे. शनिवारी वेण्णालेक परिसरात पर्यटकांच्या वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने काही काळ वाहतूक कोंडीची स्थिती निर्माण झाली.

महाबळेश्वरात रेनकोट परिधान करून गरमागरम आल्याचा चहा, चणे, चिक्की, चप्पल खरेदीसह गरम मॅग्गी, पॅटिस, मका कणिसावर पर्यटक खवय्ये ताव मारताना दिसत आहेत. येथील आल्हाददायक वातावरणाची अनुभूती पर्यटक घेत आहेत. वेण्णालेक परिसरात दाट धुक्यात पर्यटक फोटो सेल्फी घेताना दिसत आहेत. चौपाटीवर खवय्ये अनेकविध खाद्यपदार्थांवर ताव मारत आहेत. रिमझिम पावसात घोडे सवारीसाठीही पर्यटकांची गर्दी होत आहे. येथील पावसाळी पर्यटकांचे आकर्षक असलेल्या लिंगमळा धबधबा परिसर पर्यटकांना खुणावत असून हिरव्यागार डोंगररांगांमधून कोसळणारे, फेसाळणारे धबधबे आणि दाट धुक्याचे वातावरण मनाला शांतता आणि आनंद देत आहे. वेण्णा तलावाच्या पाण्याच्या प्रवाहावर मेटगुताड येथे साकारण्यात आलेला मिनी भुशी डॅम पर्यटकांच्या पावसाळी आकर्षणाचे प्रमुख ठिकाण बनला आहे. हजारो पर्यटक येथे दाखल होत निसर्गाचा आनंद घेत आहेत.

Back to top button
Don`t copy text!