
दहीगाव येथील जैन मंदिरात झालेल्या मोठ्या चोरीची गंभीर दखल घेत संशयितांचा त्वरित शोध घेण्याची मागणी फलटणच्या नगरसेविका सिद्धाली शहा यांनी केली आहे.
स्थैर्य, फलटण, दि. १० ऑगस्ट : दहीगाव (ता. माळशिरस, जि. सोलापूर) येथील श्री १००८ महावीर स्वामी दिगंबर जैन मंदिर अतिशय क्षेत्र येथे नुकत्याच घडलेल्या चोरीच्या गंभीर घटनेची तात्काळ नोंद घेऊन पोलीस व महसूल प्रशासनाला आवश्यक सूचना द्याव्यात आणि आरोपींचा त्वरित शोध घ्यावा, अशी मागणी फलटण नगरपरिषदेच्या नगरसेविका कु. सिद्धाली अनुप शहा यांनी फलटण उपविभागाच्या उपविभागीय अधिकाऱ्यांकडे (SDO) एका निवेदनाद्वारे केली आहे.
अज्ञात चोरट्यांनी लांबवला मौल्यवान ऐवज
दहीगाव येथील या प्रसिद्ध तीर्थक्षेत्रात दि. ५ ऑगस्ट रोजीच्या रात्री ते दि. ६ ऑगस्ट रोजीच्या पहाटेदरम्यान अज्ञात चोरट्यांनी मंदिरामध्ये घरफोडी करून चोरीची घटना घडवून आणली. यामध्ये मंदिरातील ३ अत्यंत मौल्यवान चांदीच्या मूर्ती, चांदीचे छत्र, सोन्याचा मुलामा दिलेला कळसाचा बेस, तसेच दानपेटी व काचेची दानपेटी फोडून त्यामधील रोख रक्कम असा मोठा ऐवज लांबवला आहे. या घटनेमुळे जैन समाजासह संपूर्ण भाविकांमध्ये तीव्र अस्वस्थता व चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून धार्मिक स्थळांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
गुन्ह्याचा सखोल तपास करण्याची मागणी
सदर चोरीच्या घटनेप्रकरणी सध्या नातेपुते पोलीस ठाण्यात आवश्यक ती कायदेशीर कारवाई सुरू आहे. मात्र, या गुन्ह्याचा तातडीने व सखोल तपास करून आरोपींना लवकरात लवकर गजाआड करणे अत्यंत आवश्यक आहे.
त्यामुळे उपविभागीय अधिकाऱ्यांनी या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन संबंधित महसूल व पोलीस प्रशासनास आवश्यक त्या सूचना द्याव्यात. तसेच या गुन्ह्याचा जलदगतीने तपास होण्यासाठी आणि भविष्यात मंदिर परिसरातील कायदा व सुव्यवस्था तसेच सुरक्षेच्या दृष्टीने योग्य त्या उपाययोजना राबवण्यासाठी तातडीने पावले उचलावीत, अशी आग्रही विनंती नगरसेविका कु. सिद्धाली अनुप शहा यांनी या निवेदनाद्वारे केली आहे.