राजमाता सईबाईंच्या समाधीसाठी ३० कोटींचा निधी रणजितदादांच्याच पाठपुराव्यातून! बोगस पत्रे व्हायरल करून श्रेय लाटण्याचा विरोधकांचा केविलवाणा स्टंट: आमदार सचिन पाटील

राजमाता सईबाई महाराणी स्मृतीस्थळासाठी मंजूर ३० कोटींच्या निधीचे श्रेय घेण्यासाठी पुराव्याविना पत्रे प्रसारित केली जात असल्याचा सचिन पाटील यांचा आरोप आहे.

स्थैर्य, फलटण, दि. ९ सप्टेंबर : राजमाता सईबाई महाराणी साहेब यांच्या स्मृतीस्थळाच्या विकासासाठी राज्य शासनाकडून ३० नोव्हेंबर २०२३ रोजी ३० कोटी रुपयांचा भरीव निधी मंजूर करणारा शासन निर्णय जारी करण्यात आला होता. हा ऐतिहासिक निधी माढा लोकसभा मतदारसंघाचे तत्कालीन खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्याच भक्कम पाठपुराव्यातून मिळाला आहे. मात्र, सध्या सोशल मीडियावर कोणतेही अधिकृत शिक्के नसलेली बोगस पत्रे व्हायरल करून या विकासकामाचे फुकटचे श्रेय लाटण्याचा केविलवाणा स्टंट काहीजण करत आहेत, असा घणाघाती आरोप फलटणचे आमदार सचिन पाटील यांनी केला आहे.

या संपूर्ण प्रक्रियेचा अधिकृत घटनाक्रम आणि पुरावे जनतेसमोर मांडताना आमदार सचिन पाटील यांनी विरोधकांचा खोटेपणा उघडकीस आणला आहे. राजमाता सईबाई राणीसाहेब यांच्या समाधीच्या विकासासाठी निधी उपलब्ध व्हावा, यासाठी तत्कालीन खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी २८ फेब्रुवारी २०२३ रोजी तत्कालीन उपमुख्यमंत्री तथा विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांना अधिकृत पत्र दिले होते. रणजितदादांचे हे पत्र १ मार्च २०२३ रोजी देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयात अधिकृतरीत्या जमा झाले असून त्यावर कार्यालयाचा शिक्का व आवक (इनवर्ड) क्रमांक स्पष्टपणे नोंदवलेला आहे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे, याच पत्रावर देवेंद्र फडणवीस यांनी रणजितदादांच्या समक्ष ‘तात्काळ निधी उपलब्ध करून द्यावा’ असा स्पष्ट लेखी शेरा दिला होता. याच भक्कम पाठपुराव्याचे फळ म्हणून पुढे ३० कोटींची तरतूद शासन निर्णयाद्वारे करण्यात आली.

सध्या सोशल मीडियावर श्रेय लाटण्यासाठी फिरवल्या जात असलेल्या पत्रांबाबत वस्तुस्थिती मांडताना आमदार सचिन पाटील यांनी स्पष्ट केले की, व्हायरल होत असलेल्या या पत्रांवर कोणत्याही मंत्र्यांचे निर्देश किंवा शेरा नाही, तसेच संबंधित खात्यामध्ये पत्र जमा केल्याचा कोणताही आवक शिक्का या पत्रांवर नाही. कोणताही शासकीय पुरावा नसलेली अशी पत्रे आजच्या काळात कुणीही सहज स्वतःच्या घरी तयार करू शकतो, असे ते म्हणाले. विकासाच्या बाबतीत माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर हे सातत्याने राज्य व केंद्र शासनाकडे पुराव्यानिशी आणि अधिकृतपणे पाठपुरावा करून कामे मार्गी लावत आहेत. त्यामुळे कोणताही अधिकृत शासकीय पुरावा नसलेली पत्रे सोशल मीडियावर व्हायरल करून स्टंटबाजी करण्याचा आणि रणजितदादांच्या कामाचे फुकटचे श्रेय घेण्याचा विरोधकांचा हा प्रयत्न अत्यंत केविलवाणा आहे. फलटण तालुक्याची जनता सुज्ञ असून त्यांना खरा विकास करणारा नेता कोण आहे हे चांगलेच माहीत आहे, असा सणसणीत टोलाही आमदार सचिन पाटील यांनी लगावला आहे.

Back to top button
Don`t copy text!