
फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ३२ गावांनी डीजे मुक्त मिरवणुकीचा, तर १५ गावांनी ‘एक गाव, एक गणपती’ उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला आहे.
स्थैर्य, फलटण, दि. १० सप्टेंबर : फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीत शांतता, सामाजिक सलोखा आणि पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी राबविण्यात येत असलेल्या उपक्रमांना गावांकडून प्रतिसाद मिळाला आहे. हद्दीतील ३२ गावांनी डीजे मुक्त गणेशोत्सव मिरवणुकीचा निर्णय घेतला असून, १५ गावांनी ‘एक गाव, एक गणपती’ उपक्रम स्वीकारला आहे.
३२ गावांत डीजे मुक्त मिरवणूक
मुंजवडी, उपळवे, काशीदवाडी, वडले, शेरेशिंदेवाडी, मठाचीवाडी, सरडे, वडजल, निंबळक, मुरूम, तातवडा, तिरकवाडी, खडकी, गिरवी, राजाळे, सोनवडी बुद्रुक, ढवळेवाडी (निंभोरे), मानेवाडी, वाघोशी, पिराचीवाडी, नाईकबोमवाडी, धुमाळवाडी, सासकल, भाडळी बुद्रुक, आंदरुड, वाखरी, ढवळेवाडी (आसू), विंचुर्णी, कुरवली बुद्रुक, राजुरी, मिरगाव, शिंदेनगर आणि दालवडी या ३२ गावांनी डीजे मुक्त गणेशोत्सव मिरवणुकीचा निर्णय घेतला आहे.
हा उपक्रम पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी धन्यकुमार गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याकडून राबविण्यात येत आहे.
१५ गावांत ‘एक गाव, एक गणपती’
शेरेचीवाडी, मानेवाडी, झडकबाईचीवाडी, ताथवडे, पिराचीवाडी, भाडळी बुद्रुक, तिरकवाडी, जाधववाडी, सावंतवाडी, राजळे, धुमाळवाडी, काशीदवाडी, गोळेवाडी, मांझेरी आणि उपळवे या १५ गावांनी ‘एक गाव, एक गणपती’ उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला आहे.
या उपक्रमांमुळे ध्वनिप्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासह सामाजिक एकोपा वाढविणे, पारंपरिक संस्कृतीचे जतन करणे आणि शांततामय वातावरण निर्माण करण्यास मदत होईल, अशी भूमिका पोलीस प्रशासनाने मांडली आहे.
सर्व गणेश मंडळे आणि नागरिकांनी पोलीस प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून शांततामय व सुरक्षित गणेशोत्सव साजरा करावा, असे आवाहन फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत सुबनावळ यांनी केले आहे.