१५ ऑक्टोबरला साखर कारखाने सुरू केल्यास संघर्ष अटळ; राजू शेट्टींचा सरकारला थेट इशारा

साखर कारखाने १५ ऑक्टोबरपासून सुरू केल्यास उसाची रिकव्हरी घटून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार असल्याने राजू शेट्टी यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.

स्थैर्य, सातारा, दि. १० सप्टेंबर : राज्य सरकारने साखर कारखान्यांचा गळीत हंगाम १५ ऑक्टोबरपासून सुरू करण्याचा निर्णय घेतला असला, तरी या निर्णयाला स्वाभिमानी शेतकरी संघटनेने तीव्र विरोध दर्शवला आहे. १५ ऑक्टोबरसारख्या लवकरच्या तारखेला गळीत हंगाम सुरू केल्यास उसाच्या साखरेचा उतारा (रिकव्हरी) कमी भरून शेतकऱ्यांचे प्रतिटन मोठे आर्थिक नुकसान होईल, असा दावा करत माजी खासदार राजू शेट्टी यांनी सरकारने प्रतिटन ५०० रुपये अनुदान दिले नाही तर १५ ऑक्टोबरला एकही कारखाना सुरू होऊ देणार नाही, असा इशारा दिला आहे.

उसाच्या रिकव्हरीत घटीमुळे शेतकऱ्यांना फटका

ऑक्टोबरच्या मध्यात ऊस परिपक्व झालेला नसतो. त्यामुळे या काळात गळीत सुरू केल्यास उसाची साखरेची रिकव्हरी १ ते १.२५ टक्क्यांनी कमी भरते. यामुळे शेतकऱ्यांच्या पुढील वर्षाच्या एफआरपीवर (FRP) थेट परिणाम होतो आणि त्यांना प्रतिटन मोठा आर्थिक फटका बसतो. उसाचा परिपक्व काळ लक्षात न घेता घाईघाईने गळीत हंगाम सुरू करणे म्हणजे शेतकऱ्यांच्या खिशावर दरोडा घालण्यासारखे आहे, असा आरोप शेट्टी यांनी केला आहे.

अनुदान द्या अन्यथा आंदोलन छेडणार

केंद्र व राज्य सरकारने १५ ऑक्टोबर ते १५ नोव्हेंबर या कालावधीत गाळप होणाऱ्या उसासाठी शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट ५०० रुपये अनुदान जमा करावे, अशी मागणी संघटनेकडून करण्यात आली आहे. सरकारने ही मागणी मान्य न केल्यास किंवा जबरदस्तीने कारखाने सुरू करण्याचा प्रयत्न केल्यास स्वाभिमानी शेतकरी संघटना रस्त्यावर उतरून तीव्र संघर्ष करेल आणि राज्यभरात एकही साखर कारखाना सुरू होऊ देणार नाही, असा आक्रमक पवित्रा त्यांनी घेतला आहे.

 

 

Back to top button
Don`t copy text!