दैनिक स्थैर्य | दि. ६ सप्टेंबर २०२४ | फलटण |
फलटण ते शिंगणापूर रस्ता कोळकी येथे जागोजागी उखडला असून ठेकेदाराचे निकृष्ट दर्जाचे काम चव्हाट्यावर आले आहे. विशेष म्हणजे हा रस्ता फेब्रुवारी २०२४ मध्येच केलेला आहे. केवळ सहा महिन्यांतच या रस्त्याची दूरवस्था झाल्याचे पाहायला मिळत आहे. हा रस्ता उखडल्यामुळे वाहनधारकांना तसेच नागरिकांचा याचा मोठा त्रास होत असून पावसाचे पाणी या रस्त्यात साचत आहे.
या रस्त्याच्या दूरवस्थेकडे ग्रामपंचायत व बांधकाम विभागाचे दुर्लक्ष असून वाहनधारक व नागरिकांना येथून जाताना मोठी कसरत करावी लागत आहे.
ग्रामीण विकास कार्यक्रमातून या रस्त्याचे काम झाले असून १५ लक्ष रुपये या रस्त्यासाठी खर्च झाले आहेत. या रस्त्याच्या देखभालीची जबाबदारी ३ वर्षे ठेकेदाराकडे असून या रस्त्याच्या निकृष्ट कामाची चौकशी होऊन कारवाई व्हावी, अशी मागणीही नागरिक करत आहेत.