दैनिक स्थैर्य । दि. ०३ ऑगस्ट २०२३ । मुंबई । नाशिक परिक्षेत्राचे माजी विशेष पोलीस महानिरीक्षक व राज्य लोकसेवा आयोगाचे सदस्य डॉ. प्रताप दिघावकर यांनी बुधवारी भारतीय जनता पार्टी मध्ये प्रवेश केला. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांचे स्वागत केले. भाजप प्रदेश कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमाला आमदार दिलीप बोरसे, भाजपा प्रदेश सरचिटणीस विजय चौधरी, विक्रांत पाटील, माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, प्रदेश प्रवक्ते अतुल शाह, सटाण्याचे माजी नगराध्यक्ष सुनील मोरे आदी उपस्थित होते.
डॉ. दिघावकर यांच्या बरोबर नाशिक जिल्हयातील विविध राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. रायगड जिल्ह्यातील डॉ. दिघावकर यांच्या प्रशासनातील अनुभवाचा पुरेपूर उपयोग करून घेतला जाईल. तसेच उत्तर महाराष्ट्रातील पाणी प्रश्न सोडविण्यासाठी पक्ष आणि सरकार पातळीवरून आवश्यक ते सर्व प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावेळी दिली. भारतीय जनता पार्टी च्या वाढीसाठी आपण समर्थपणे योगदान देऊ तसंच केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून उत्तर महाराष्ट्रातील विकासाचे विविध प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करू, असे डॉ . दिघावकर यांनी यावेळी सांगितले.
डॉ. दिघावकर यांच्यासमवेत बळीराजा आत्मसन्मान संघटनेचे भाऊसाहेब आहिरे, सटाणा बाजार समितीचे माजी सभापती बाळासाहेब भदाणे, नामपूर बाजार समितीचे माजी सभापती कृष्णा भामरे, चारुशीला बोरसे , विक्रम मोरे, भाऊसाहेब कापडणीस, कृषीभूषण खंडू अण्णा शेवाळे, वैशाली सूर्यवंशी यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी या कार्यक्रमात भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला.