राजर्षी शाहू महाराजांचे संपूर्ण कार्य राष्ट्र बांधणीचे – इतिहास संशोधक, समाजप्रबोधक डॉ. जयसिंगराव पवार


स्थैर्य, मुंबई, दि. ०७: धर्मभेद, वर्णभेद, जातीभेद आणि अज्ञान नष्ट करून जनतेमध्ये ज्ञान निर्माण करण्याचे कार्य राजर्षी शाहू महाराजांनी संपूर्ण आयुष्यभर केले, हे कार्य राष्ट्र बांधणीचे कार्य असल्याचे प्रतिपादन इतिहास संशोधक, समाजप्रबोधक डॉ. जयसिंगराव पवार यांनी केले.

नवी दिल्ली येथील महाराष्ट्र परिचय केंद्राच्या वतीने आयोजित महाराष्ट्र हीरक महोत्सव व्याख्यानमालेत डॉ. जयसिंगराव पवार  “छत्रपती शाहू महाराज आणि राष्ट्रीय एकात्मता” या विषयावर 42 वे पुष्प गुंफताना बोलत होते.

यावेळी डॉ. पवार म्हणाले, राजर्षी शाहू महाराज आणि राष्ट्रीय एकात्मता हा विषय समजण्यासाठी आधी राष्ट्र समजुन घेतलं पाहिजे. आपल्या सर्वांमध्ये राष्ट्रीय, भावनात्मक, सांस्कृतिक, सामाजिक बंध आहे. या सर्व बंधांमधूनच राष्ट्रीय एकात्मता निर्माण होत असते.

सामाजिक स्वातंत्र्य मिळविण्यासाठी महात्मा फुले यांच्या पासून ते डॉ. बाबासाहेब आंबेडकरापर्यंत झालेले कार्य हे  राष्ट्रीय बांधणीचे असल्यामुळे यांना केवळ सुधारक न म्हणता राष्ट्रपुरुष म्हणायला पाहिजे.

महात्मा गांधींनी शाहू महाराजांना स्वराज्याचे संस्थापक मानले होते. कारण शाहू महाराजांनी त्यांच्या संस्थानात अस्पृश्यता नष्ट करून स्वराज्य निर्माण करण्याचे कार्य केले. राष्ट्रीय एकात्मता साध्य करायची असेल तर सर्वात प्रथम पारतंत्र्य नष्ट केले पाहिजे. राजकीय स्वातंत्र्यांचा लढा असो वा सामाजिक समतेचा लढा असो यासाठी राष्ट्रीय एकात्मता असने सर्वात महत्त्वाचे आहे यासाठी शाहू महाराजांनी पूरेपर प्रयत्न केला असल्याचे डॉ. पवार यांनी सांगितले.

राष्ट्रीय एकात्मता  निर्माण करण्यासाठी सर्वात मोठे अडथळे हे पारतंत्र्यासह‍, धर्मभेद, वर्णभेद, जातीभेद, अज्ञान हे घटक आहेत. हे दूर करण्यामध्ये महात्मा फुले, शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील, संत गाडगे महाराज यांनी शेवटपर्यंत प्रयत्न केले, त्यात त्यांना यशही आले, असल्याचे डॉ. पवार यांनी सांगितले.

1894 ला शाहू महाराजांचा राज्यभिषेक झाला. त्यापुर्वी 1893 ला मुंबईमध्ये हिंदू-मुस्लिम दंगल झाली होती. शाहू महाराजांचा अभिनंदनाचा कार्यक्रम पुण्यात 1995 मध्ये आयोजित करण्यात आला होता. त्यात शाहू महाराज म्हणाले होते, हिंदू-मुस्लिम हे दोन्ही धर्मीय या देशाचे घटक आहेत, यापुढे अशी दंगल होता कामा नये अशी अपेक्षा त्यांनी याठिकाणी व्यक्त केली होती. 1857 साली हिंदू आणि मुस्लिम खांद्याला खांदा लावून लढले होते. या लढ्यातुन पुढे इंग्रजांनी फोडा आणि राज्य करा अशी नीती अवलंबली. शाहू महाराज हे इंग्रजांचे मांडलिक असूनही हिंदू-मुस्लिम ऐक्याची भाषा बोलत होते. शाहू महाराजांच्या आयुष्यात धर्मापेक्षा राष्ट्राला मोठे स्थान होते, असे डॉ. पवार यांनी सांगितले.

राष्ट्रीय एकात्मते विषयी शाहू महाराजांचे विचार सांगताना डॉ. पवार म्हणाले, आम्ही सर्व हिंदी आहोत, या भूमीवर जन्म घेणारे कोणत्याही धर्माचे असो ते सर्व हिंदी आहेत, व्यक्तीच्या दृष्टीने धर्माची बाब महत्त्वाची असेल, मात्र राष्ट्राच्या हिताच्या अनुषघांने धर्म आड येता कामा नये, असे सार्वजनिक कार्यक्रमात शाहू महाराज म्हणाले होते. या विचारांना सोडून आजही राष्ट्र बांधले जाऊ शकत नाही. मुस्लिम आणि हिंदू लोकांचे पोषाख, आचार, विचार सर्व समानच आहेत. त्यामुळे मी केवळ हिंदूचा राजा आणि मुस्लिमांचाही राजा आहे, असे शाहू महाराज म्हणत असत. मुळ अरबीमध्ये असणारे कुराणाचा उर्दुत अनुवाद करण्‍यासाठी शाहू महाराजांनी त्याकाळी 25 हजार रूपये खर्च केले. कुराण हे सर्वांना कळावे अशी यामागची भावना असल्याचे डॉ. पवार यांनी सांगतिले.

पाठगावाच्या मौनीबाबाच्या मठातील उत्पनाचा काही भाग मशिदीला जोडून दिला होता. तर शिरोळला पीरबाबाचा दरगाहाचे उत्पन्न हे जवळच्या अंबाबाई देवस्थानाला जोडून दिले होते. यासर्वांमधून मशजिद आणि मंदिर काही वेगळी नाहीत हे त्यांना दाखवायचे होते. आजही कोल्हापूरात धार्मिक ऐक्य दिसून येते, मोहर्रम आणि गणपती उत्सव एकाचवेळीला असल्यास  दोन्ही सण मिळून साजरे करण्याची पंरपरा कोल्हापूरात आहे. हिंदू-मुस्लिमांचे ऐक्याचा धडा राष्ट्रापुढे शाहू महाराजांनी घालून दिला असल्याचे डॉ. पवार यांनी सांगितले.

जातीभेदाच्या पोटातच अस्पृश्यता आहे असे नमूद करून डॉ. पवार म्हणाले, शाहु महाराजांना जातीभेदाचे मनोरे तोडायचे होते. त्यासाठी, त्यांनी आपल्या भाषणात जपानमधील समुराई वर्गाचे उदाहरण दिले होते, जपानमध्येही काही वर्ग उच्च व काही निम्न समजले जायचे मात्र, देशाची प्रगती व्हावी यासाठी जपानमधल्या समुराई वर्गाने आपले सर्व हक्क, आपली प्रतिष्ठा ही राष्ट्राच्या चरणी अर्पण करून सामान्य माणसासारखे जीवन जगायला सुरूवात केल्याचे त्यांनी जाहीर केले, त्यामुळेच एक विकस‍ित राष्ट्र एक बलदंड राष्ट्र म्हणुन जपानचा उदय झाला, असेच या देशात व्हावे यासाठी प्रयत्न होणे गरजेचे जाणुन शाहू महाराजांनी जाणीवपूर्वक प्रयत्न केले.

जातीभेदाचे सर्वात वाईट दर्शन आपल्याला अस्पृश्यतेमध्ये दिसते, असे शाहू महाराज म्हणायचे. कुत्रा, मांजर, डुकरे हे प्राणी माणसाला चालायचे  मात्र, हाडा मासाचा माणुस नाही चालत, हे अतिशय शोचणीय आहे. आपल्या देशात असणारा जातीभेद जगाच्यापाठीवर कोठेही नाही. ज्यारितीने अस्पृश्य लोकांना वागविले जाते, तशाप्रकारे जगात कुठेही माणसाला वागवले जात नाही. ही शरमेची बाब असल्याचे शाहू महाराजांनी अस्पृश्येच्या सभेत म्हणाले असल्याचे, डॉ. पवार यांनी सांगितले. शाहू महाराजांनी जातीभेद नष्ट करण्यासाठी स्वत: संस्थानातून सुरवात केली. हत्तीवरचे माहूत, गाडीचे ड्रायवर, शिकार खाण्यावर अस्पृश्यांना कामावर नेमले होते. येवढेच नव्हे तर, सोनतळीला असणाऱ्‍या देवस्थानात त्यांनी पुजारीही नेमले होते. हे सर्व प्रयोग करताना यामागे राष्ट्रीय एकात्मता निर्माण करण्याचीच भावना होती. शाहू महाराज म्हणायचे तुम्ही कोणत्या धर्माचे आहात हे महत्त्वाचे नाही. तुम्ही कोणत्या देशाचे आहात हे सर्वाधिक महत्त्वाचे आहे. त्तत्कालीन राजकीय लोकांना शाहू महाराजांनी सवाल केला होता जोपर्यंत सामाजिकस्तरावरील समानता या देशात येत नाही तोपर्यंत स्वातंत्र्यांला काही अर्थ राहणार नाही. राष्ट्रीय एकात्मता निर्माण होण्यासाठी शिक्षण, जागरूकता, समंजसपणा, ज्ञानी होणे गरजेचे आहे.

यासाठी शाहू महाराजांनी आपल्या संस्थानामध्ये शिक्षणावर एकूण मिळकतीचा सहावा भाग खर्च करीत असत. ते म्हणत जर माझी जनता शिक्ष‍ित झाली तर माझे राज्य मी सर्वसामान्यांच्या हातात देईल. असे, डॉ. पवार यांनी सांगितले. संविधानामध्ये अंतर्भुत असलेली  धर्मनिरपेक्षतेमुळे राष्ट्रीय एकात्मता टिकून आहे. आज काही प्रमाणात देशाची स्थिती वेगळी आहे. काही वेळेला काही लोक आमचा धर्म श्रेष्ठ आणि इतर धर्म दुय्यम असल्यासारखे वागतात ते अंत्यत चुकीचे वर्तन असल्याचे डॉ. पवार म्हणाले. जर हे राष्ट्र आम्हाला टिकवायचे असेल तर आम्ही सर्वधर्माचे आहोत, आमचे राष्ट्र हे अनेक धर्मींयांचे  आहे, असे म्हणावेच लागेल. यासाठी आम्हाला शिक्ष‍ित व्हावे लागेल ज्ञान अर्जित करावे लागेल. महात्मा फुलेंपासून ते भाऊराव पाटीलांपर्यंत 97 टक्के लोक कसे शहाणे होतील यासाठी  शेवटीपर्यंत प्रयत्नरत राहीले.  यावरून ते किती दूरद्रष्टे होते हे लक्षात येते. 97 टक्के लोक जेव्हा धर्मनिरपेक्ष बुद्धीने वागतात तेव्हा देश धर्मनिरपेक्ष होतो. याचे मुल्याकंन होणे ही गरजेचे असल्याचे डॉ. पवार म्हणाले.


Back to top button
Don`t copy text!