
रानगव्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या विडणी येथील राजाराम यादव यांना लोकसेवा हमी कायद्यांतर्गत शासनाकडून ५ लाख रुपयांची आर्थिक मदत मंजूर झाली आहे.
स्थैर्य, विडणी, दि. ०३ ऑगस्ट : फलटण तालुक्यातील विडणी येथे रानगव्याच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या राजाराम जयसिंग यादव (वय ६९) यांना महाराष्ट्र शासनाच्या वतीने ५ लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली आहे. ही शासकीय मदत लोकसेवा हमी कायद्यांतर्गत २३ जुलै रोजी त्यांच्या बँक खात्यात थेट वर्ग करण्यात आली असल्याची माहिती आमदार सचिन पाटील यांनी दिली.
लोकप्रतिनिधींचा पाठपुरावा ठरला यशस्वी
विडणी येथे रानगव्याचा हल्ला झाल्याची घटना घडल्यानंतर माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी यादव यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांना धीर दिला होता, तसेच शासनाकडून जास्तीत जास्त मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले होते. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन आमदार सचिन पाटील यांनी विधानसभेच्या अधिवेशनात प्रश्न उपस्थित करत सरकारचे लक्ष वेधले होते.
रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि आमदार सचिन पाटील यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे ही मदत तातडीने मंजूर झाली आहे.
शासकीय मदत खात्यात वर्ग झाल्यानंतर आमदार सचिन पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि वनमंत्री गणेश नाईक यांचे विशेष आभार मानले आहेत.
