फलटणमध्ये २९ सप्टेंबरला रोजगार मेळावा; बेरोजगार युवकांना नोकरीची संधी

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा

मुधोजी महाविद्यालयात २९ सप्टेंबर रोजी रोजगार मेळावा होणार असून, कौशल्य प्रशिक्षणासह रोजगाराच्या विविध संधींची माहिती युवकांना देण्यात आली.

स्थैर्य, फलटण, दि. १७ सप्टेंबर : युवकांना कौशल्य प्रशिक्षण, रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी शासनाच्या विविध योजना राबवल्या जात आहेत. याच अंतर्गत २९ सप्टेंबर रोजी मुधोजी महाविद्यालयात रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला असून, फलटण तालुक्यातील बेरोजगार उमेदवारांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे धनाजी बागल यांनी केले.

‘लोकसंवाद-२०२६’मधून योजनांची माहिती

गणेशोत्सवाच्या काळात शासनाच्या विविध योजना थेट नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने श्रीमंत शुक्रवार पेठ तालीम गणेश उत्सव मंडळ येथे ‘लोकसंवाद-२०२६’ कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी जिल्हा माहिती अधिकारी हेमंत चव्हाण यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागाच्या विविध योजनांची माहिती देताना धनाजी बागल यांनी युवकांना रोजगारक्षम बनवणे, उद्योगांच्या गरजेनुसार कुशल उमेदवार उपलब्ध करून देणे आणि आधुनिक प्रशिक्षणाच्या माध्यमातून आवश्यक कौशल्य विकसित करण्यावर विभागाचा भर असल्याचे सांगितले. उमेदवारांना ई-प्रशासनाच्या माध्यमातून पारदर्शक आणि विकेंद्रित पद्धतीने सेवा उपलब्ध करून दिल्या जात असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

१५ ते ४५ वयोगटासाठी मोफत प्रशिक्षण

नोकरी इच्छुक उमेदवार आणि उद्योजकांसाठी विभागाच्या वेबपोर्टलवर विविध सुविधा उपलब्ध आहेत. उमेदवारांना मोफत ऑनलाइन नावनोंदणी करून खासगी क्षेत्रातील रिक्त पदांसाठी थेट अर्ज करता येतो.

जिल्ह्यातील उद्योगांची गरज लक्षात घेऊन १५ ते ४५ वयोगटातील उमेदवारांना तीन ते सहा महिन्यांचे आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित मोफत प्रशिक्षण दिले जात आहे. प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना, प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास अभियान आणि प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्र या योजनांच्या माध्यमातून युवकांना कौशल्य प्रशिक्षण देऊन रोजगार आणि स्वयंरोजगारासाठी सक्षम करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

२९ सप्टेंबरला राज्यभर रोजगार मेळावे

राज्यभर २९ सप्टेंबर रोजी एकाच दिवशी रोजगार मेळावे आणि प्लेसमेंट ड्राइव्ह आयोजित केले जाणार आहेत. फलटणमध्ये मुधोजी महाविद्यालय येथे रोजगार मेळावा होणार आहे. तालुक्यातील बेरोजगार उमेदवारांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन बागल यांनी केले.

‘लोकसंवाद-२०२६’ कार्यक्रमाला श्रीमंत शुक्रवार पेठ तालीम गणेश उत्सव मंडळाचे अध्यक्ष जितेंद्र (गब्बर) मठपती, उपाध्यक्ष किरण देसाई, विजय पोतदार, आकाश पालकर, खजिनदार निलेश राऊत, राहुल (काका) निंबाळकर, सचिव राजेश काशीद, भूषण कापसे, समर्थ तेली यांच्यासह नीलेश खानविलकर, प्रीतम (आबा) बेंद्रे, निलेश चिंचकर, राकेश तेली, विकास राऊत, विजय पालकर आणि बापुराव देशमुख उपस्थित होते.

Back to top button
Don`t copy text!