दैनिक स्थैर्य । दि. ३० जुलै २०२२ । सातारा । वाठार स्टेशन येथील अर्धवट असलेले रेल्वेचे भुयारी मार्ग तसेच इतर रखडलेली कामे जलद गतीने करावी, यासाठी रेल्वे प्रशासनाच्या विरोधात वाठार स्टेशन येथे शिवसेना जिल्हा उपप्रमुख अमोल आवळे यांच्याा नेतृत्वाखाली सर्वपक्षीय रेल रोको आंदोलन करण्यात आले.
वाठार स्टेशन येथील पोलादपूर पंढरपूर राज्यमार्गावरील रेल्वे गेट नंबर ४५ हे रेल्वे प्रशासनाच्या वतीने वाहतुकीसाठी कायमस्वरूपी बंद करून पर्यायी मार्ग काढला आहे. लोकांना बाजार पेठेत येण्याजाण्यासाठी गेट नंबर 45 च्या ठिकाणी पादचाऱ्यांसाठी भुयारी मार्गाचे काम चालू होते. परंतु, गेल्या नऊ ते दहा महिन्यांपासून सदर भुयारी मार्गाचे काम अपूर्ण अवस्थेत असून रेल्वेच्या पूर्वेकडून पश्चिम बाजूस बाजारपेठेत जाण्यासाठी लोकांची मोठी गैरसोय होत होती. अर्धवट भुयारी मार्गाच्या बाजूने रेल्वे पठरी ओलांडून जाण्यासाठी एक फुटाची अरुंद पाऊलवाट आहे. त्यातून जाताना बऱ्याच वेळा घसरून अनेक नागरिक दहा ते पंधरा फूट खड्ड्यात पडले आहेत. याबाबत स्थानिक प्रशासन व लोकप्रतिनिधींनी रेल्वे प्रशासनाला वारंवार सूचना तसेच निवेदन देऊनसुद्धा अपूर्ण असलेला भुयारी मार्ग तसेच नवीन पर्यायी मार्गाच्या बाजूने पथदिवे, गटार व्यवस्था ही कामे पूर्ण न झाल्याने तसेच रेल्वे प्रशासनाला जाग आणण्यासाठी शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख अमोल आवळे यांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय रेल्वे रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी कोल्हापूरहून मुंबईकडे जाणारी कोयना एक्सप्रेस ही गाडी वाठार स्टेशन येथील पूर्वीचे गेट नंबर ४५ वर रोखण्यात आली यावेळी सर्वपक्षीय कार्यकर्ते रेल्वे प्रशासनाचा निषेध करत घोषणाबाजी केली. यावेळी पाच मिनिट रेल्वे थांबवण्यात आली रेल्वे प्रशासनाने दोन महिन्यात रखडलेली कामे करण्याच्या आश्वासनानंतर रेल्वे मार्गस्थ झाली. यावेळी रेल्वे पोलीस प्रशासन तसेच कोरेगावचे उपविभागीय अधिकारी गणेश किंद्रे वाठार स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक संदीप बनकर यांनी रेल्वे रोको आंदोलनात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी विशेष खबरदारी घेतली. सदर रेल्वे रोको आंदोलनात नागेश जाधव, संजय भोईटे, संजय माने, हेमंत दोरके, इरफान पठाण, ऋषीं जाधव, आसिफ शेख, शामराव चव्हाण, संतोष सोळसकर, सुरेश दोरके, इरशाद मोमीन, रमेश अहिरेकर, मोहसीन मुलाणी, श्रीकांत निकम, तसेच सर्वपक्षीय कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.