दैनिक स्थैर्य । दि. ३० जुलै २०२२ । कराड । पनवेलहून गावी निघालेल्या प्रवासी महिलेकडील तब्बल तीस तोळ्याचे दागिने चोरट्यांनी लंपास केले. कराड ते पेठनाका यादरम्यान हा प्रकार घडला. याप्रकरणी कराड शहर पोलिसात अज्ञात तीन महिलांवर गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
सुशिला सर्जेराव कांबळे (वय ५८, रा. पनवेल, मुळ रा. नाठवडे, ता. शिराळा, जि. सांगली) यांनी याबाबतची फिर्याद पोलिसात दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिराळा तालुक्यातील नाठवडे येथील सुशिला कांबळे या पनवेलमध्ये कुटूंबियांसह वास्तव्यास आहेत. गुरूवारी काही कामानिमित्त त्या पनवेलहून एसटीने गावी निघाल्या होत्या. सोबत असलेल्या पर्समध्ये त्यांनी सुमारे तीस तोळे सोन्याचे दागिने ठेवले होते. सायंकाळी एसटी कºहाड बसस्थानकात आली. त्यावेळी सुशिला कांबळे या एसटीमधून खाली उतरल्या. काही मिनिटे खाली थांबल्यानंतर त्या पुन्हा एसटीमध्ये चढल्या. एसटी कराड बसस्थानकातून सांगलीकडे मार्गस्थ झाली. पेठनाका येथे एसटी थांबल्यानंतर तीन महिला एसटीतून खाली उतरल्या. त्यानंतर एसटी पुढे निघाली. दरम्यान, काही अंतरावर गेल्यानंतर तीस तोळे सोने असलेली पर्स चोरीस गेल्याचे सुशिला कांबळे यांच्या निदर्शनास आले. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर कराड शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शाखेचे पथक तातडीने रवाना झाले. या पथकाने पेठनाका येथे संशयीत महिलांचा शोध घेतला. मात्र, संबंधित महिला पोलिसांच्या हाती लागल्या नाहीत. याबाबतची नोंद कºहाड शहर पोलिसात झाली आहे. पोलीस उपनिरीक्षक अर्जुन चोरगे तपास करीत आहेत.