संशोधनाचा आधार पुरोगामी विचारांना मिळवून देणाऱ्या प्रा. हरी नरके यांची सातत्याने पोकळी जाणवत राहील – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य । दि. १० ऑगस्ट २०२३ । मुंबई । “संशोधनाचा आधार पुरोगामी विचारांना मिळवून देण्याचे बहुमूल्य कार्य प्रा. हरी नरके यांनी केले. स्त्री आधार केंद्र आणि क्रांतिकारी महिला संघटनेच्या समतावादी विचारांचे ते सहप्रवासी होते. त्यांच्या जाण्याने सातत्याने पोकळी जाणवत राहील”, अशा शब्दांत उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी ज्येष्ठ लेखक, विचारवंत प्रा. हरी नरके यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे शोक संदेशात म्हणाल्या, “प्रा. हरी नरके थोर विचारवंत आणि कृतिशील कार्यकर्ते होते. ते शाळेत शिकत असल्यापासून त्यांचा आणि माझा परिचय होता. स्त्री आधार केंद्र आणि क्रांतिकारी महिला संघटनेच्या अनेक कार्यक्रमांमध्ये ते सहभागी झालेले होते. यासोबतच भटक्या- विमुक्तांच्या चळवळी आणि महात्मा जोतिराव फुले यांच्या जीवनकार्याबद्दल त्यांनी बहुमूल्य संशोधन केले आहे. वेगवेगळ्या सामाजिक कार्यांपैकी अनेक कार्यक्रमांना, महिला परिषदांना त्यांचा सक्रिय सहभाग होता. पुणे विद्यापीठामध्ये आणि इतर अभ्यास विषयक समित्यांमध्ये, साहित्य संस्कृती मंडळामध्ये त्यांनी चांगल्याप्रकारे सहभाग घेतलेला होता. वक्तृत्व, समन्वय आणि अभ्यास असूनसुद्धा राजकीय मतभेदाला त्यांना सामोरे जावे लागले. पण ज्यावेळी विविध वैचारिक प्रवाहांमध्ये काम करणारी माणसे असतात, त्यांना अशाप्रकारे संघर्षाला सामोरे जाणे अपरिहार्य असते. पण तरीही त्यांनी कुणाच्या दबावाला बळी न पडता काम चालू ठेवले.”

स्त्री आधार केंद्राचे अध्यक्ष, क्रांतिकारी महिला संघटनेची संस्थापक आणि विविध सामाजिक संघटनांच्यावतीने उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी श्रद्धांजली वाहिली. “विधानपरिषदेची उपसभापती या नात्याने प्रा. हरी नरके यांच्या अभ्यासाचा, संशोधनाचा उपयोग आम्ही विधिमंडळात निश्चितपणे करून घेऊ. प्रा. हरी नरके यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत”, अशा शब्दांत उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी प्रा. हरी नरके यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त करुन श्रद्धांजली वाहिली आहे.


Back to top button
Don`t copy text!