विधानसभेच्या उमेदवारीसाठी प्रा. अनिल जगताप यांची जगतापवस्ती येथे कार्यकर्त्यांबरोबर बैठक

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य | दि. २७ सप्टेंबर २०२४ | फलटण |
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खा. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून माजी जिल्हा परिषद सदस्य प्रा. अनिल जगताप हे फलटण-कोरेगाव विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी आग्रही आहेत. त्याबाबत त्यांनी पक्षाकडे आपला इच्छुक उमेदवारी अर्जसुद्धा दाखल केला आहे. या पार्श्वभूमीवर गुरुवारी सायंकाळी जगतापवस्ती (सिद्धार्थ नगर) येथे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची उमेदवारी मिळणेबाबत प्रा. जगताप यांची कार्यकर्त्यांबरोबर बैठक झाली.

विधान परिषदेचे माजी सभापती तथा विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वात प्रा. अनिल जगताप यांनी कामकाज केले असून सन १९९७ साली ते आसू – गुणवरे गटातून जिल्हा परिषदेवर निवडून गेले होते. त्यांचा फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघात दांडगा जनसंपर्क असून आगामी काळात जर पक्षाच्या वतीने संधी मिळाली तर नक्कीच पूर्ण ताकदीने निवडणूक लढवणार आहेत.

प्रा. अनिल सीताराम जगताप यांचे फलटण तालुक्यातील गोखळी हे गाव आहे. ते पुसेगाव येथील रयत शिक्षण संस्थेच्या कला व वाणिज्य महाविद्यालयात उपप्राचार्य म्हणून कार्यरत आहेत. रयत शिक्षण संस्थेत ते कार्यरत असल्याने त्यांचे थेट शरद पवारांशी संबंध आहेत. आगामी निवडणुकीबाबत प्रा. अनिल जगताप हे शरद पवारांच्या संपर्कात आहेत.

जगताप यांनी आपल्या उमेदवारीबाबत सांगितले की, मी गेल्या अनेक वर्षांपासून शरद पवार साहेबांच्या नेतृत्वात कामकाज करीत आहे. जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून गेल्यानंतर यशवंत घरकुल योजना हि जिल्हा परिषदेच्या माध्यमातून सुरु करण्यात माझे योगदान आहे. माझी ५ वैचारिक पुस्तके प्रकाशित झाली असून मी छत्रपती शिवाजी विद्यापीठात संशोधन करणार्‍या विद्यार्थांचा प्रशिक्षक म्हणून सुद्धा कामकाज करीत आहे. यासोबतच दलित व आंबेडकरी चळवळीत सुद्धा मी काम करीत आहे. यापूर्वी मी शरद पवार साहेबांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जिल्हा संघटक म्हणून काम केले असून सद्य स्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षामध्ये सामाजिक ज्ञान विभागाचे उपाध्यक्ष पदाची जबाबदारी माझ्यावर आहे. सद्गुरू श्री मानाजीबाबा बहुउद्देशीय तथा शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष पद सुद्धा माझ्याकडे आहे.

यापूर्वी विधान परिषदेचे माजी सभापती तथा विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर व राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते स्व. सुभाषराव शिंदे यांच्यासोबत फलटण तालुक्यात सक्रिय कामकाज केले आहे. मागील दोन्ही पंचवार्षिक निवडणुकीत आमचे नेते शरद पवार साहेबांकडे विधानसभा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली होती; परंतु तत्कालीन परिस्थितीमध्ये सुद्धा आम्ही पवार साहेबांच्या सोबत एकनिष्ठपणे राहिलो असून आगामी काळात सुद्धा पवार साहेबांच्या सोबत आम्ही राहणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.


Back to top button
Don`t copy text!