दैनिक स्थैर्य | दि. 27 सप्टेंबर 2024 | साखरवाडी | साखरवाडी मध्ये एसटी स्टँड हे एक तीर्थक्षेत्र असून या तीर्थक्षेत्रावरून साखरवाडीसह पंचक्रोशीमध्ये चालणाऱ्या घडामोडींवर लक्ष ठेवले जाते व यामध्ये एकमेकांचे पाय ओढण्याचे काम देखील स्टँड नजिक असणाऱ्या विविध हॉटेलमध्ये बसून नेते मंडळी करीत असतात. येणाऱ्या काळामध्ये साखरवाडीचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी एकमेकांचे पाय ओढायचे थांबवा! असे स्पष्ट मत विधान परिषदेचे माजी सभापती तथा विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केले.
साखरवाडी येथील गणेश मंडपामध्ये आयोजित कार्यक्रमात श्रीमंत रामराजे बोलत होते. यावेळी आमदार दीपक चव्हाण, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्यासह विविध मान्यवरांची उपस्थिती होती.
यावेळी बोलताना श्रीमंत रामराजे म्हणाले की; जर तुम्हाला आमच्या मागे ताकद द्यायची नाही तर खंडाळा येथील रेस्ट हाऊस वर साखरवाडी मधील जनता का आली ? ज्यावेळी साखरवाडी गावावर अडचण आली त्यावेळी रामराजे व त्यांचे दोन्ही भाऊ खंबीर उभे होते आहेत. साखरवाडीमधील गट तट एकत्र करून काम करा! तरच मतदानात फरक दिसेल. मी १९५७ साली साखरवाडीचे वैभव बघितले आहे आणि त्यानंतर त्याचे गेलेले वैभव आता तर २० हजार मेट्रिक टन कारखाना होणारी माणसे आपण साखरवाडी येथे आणली आहेत. आता सुरू असलेला कारखाना चालण्याचे यांना देणे घेणे नाही. प्रल्हाद पाटील किंवा रामराजे यांच्या मधील एकालाच धरा. माझा भारतीय जनता पार्टीला विरोध नाही. गटबाजी बंद करून विकासाच्या बाजूने उभे राहणारे मतदार आले म्हणूनच बारामतीचा विकास झाला.
ह्या खासदारकीच्या निवडणुकीत खोटा प्रकार आपल्या सर्वांच्या समोर आला आहे. साखरवाडी कारखाना हा संपूर्ण तालुक्यासाठी आहे. साखरवाडीला आपली जबाबदारी कळत नाही. साखरवाडी पंचक्रोशीत आम्ही कुठे व का कमी पडलो हा प्रश्न नेहमी मला पडत आहे. कदाचित विकास कमी झाला असेल परंतु मी कुणाचेही वाईट केले नाही. यांनी खासदारकीच्या काळात काय काय केले हे तालुक्याला माहित आहे. तुम्हाला मतदान करताना हे लक्षात का आले नाही. एवढे करून सुद्धा आपल्याला काही मिळाले का नाही हे बघणे गरजेचे आहे. ९६ साली मंत्रालयातून आम्ही साखरवाडी येथे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था लावली होती. ज्या माणसाच्या नावाने हे साखरवाडी मधील काही जण राहिले आहेत जर कमिन्स कंपनी आली नसती तर ह्यांना स्क्रॅप मिळाले असते का ? मी जे शब्द दिले आहेत त्यामधील काही प्रश्न वगळता इतर सर्व प्रश्न मार्गी लावले आहेत. ह्या माजी खासदारांनी नक्की काय केले आहे ? त्यावर बोलावे इतर मार्गे म्हणजे अगदी काही मंत्र्यांच्या कडून प्रेशर टाकण्याचे काम केले आहे. मी आता राज्याच्या नेतृत्वावर बोलणार नाही कारण माझी काही कामे अडकू शकतात; असे मत सुद्धा यावेळी श्रीमंत रामराजे यांनी व्यक्त केले.
यावेळी बोलताना रामराजे म्हणाले की; आता तालुक्यातील जनतेने एकाच ठिकाणी कायम राहावे. आता कार्यकर्त्यांची चालू गिरी खपवून घेणार नाही. ज्यांच्या मनात राजाची भावना असते त्याला राजघराण्यात जन्म घेण्याची आवश्यकता नसते. प्रल्हाद पाटील यांच्याकडून कोणता प्रश्न सोडवला. या खासदारांनी नक्की कोणता प्रश्न सोडवला ? केंद्रातून नक्की कोणता निधी आणला. रणजितसिंह यांच्या बद्दल माझ्या मनात वैयक्तिक वाद नाही. जो विकास करू शकत नाही त्याबाबत मला जास्त बोलायचे नाही. बारामतीला पाणी गेले म्हणून ऊस कमी झाला आहे का ? पाणी चोरल्याशिवाय पाणी वाढणार आहे का ? जर आमदार निवडून आणला नाही तर यांना मलठण येथे जाऊन बाणगंगा नदीत मासे पकडावे लागणार आहेत. तालुक्याचं भविष्य जो सुरक्षित ठेवेल त्याच्या सोबत आपल्याला जायचं आहे.
श्रीमंत रामराजे यांनी पाण्याविषयाजी सातारा जिल्ह्यामध्ये काम केले आहे. फलटण तालुक्यासह पश्चिम महाराष्ट्रावर श्रीमंत रामराजे यांचे प्रचंड उपकार आहेत. श्रीमंत रामराजे आमदार झाले होते तेंव्हा संपूर्ण पश्चिम महाराष्टाचे अपक्ष आमदारांची एकी करत सरकारवर दबाव टाकत कृष्णा खोरे महामंडळाची स्थापना केली व तेथून आपले पाण्याचे प्रश्न मार्गी लावले. श्रीमंत रामराजे यांचे आपल्या तालुक्यासह संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रावर मोठे उपकार आहेत. श्रीमंत रामराजे यांचे हे कार्य संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रावर पाण्याच्या बाबतीत फार मोठे कार्य आहे. धोम बालकावडी धारण हे कोणत्याच नियमात बसत नव्हते त्याची सर्व शासकीय पूर्तता करत श्रीमंत रामराजे यांनी सदरील प्रकल्प नुसता उभाच केला नाही तर ते शेवट सुद्धा नेहण्याचे काम श्रीमंत रामराजे यांनी केले आहे; असे मत यावेळी आमदार दीपक चव्हाण यांनी व्यक्त केले.
यावेळी बोलताना आमदार चव्हाण म्हणाले की; श्रीमंत रामराजे यांच्यावर फलटण तालुक्यासह सातारा जिल्ह्याचा एक विश्वास आहे. सध्या तालुक्यात खोटे बोलण्यारांची एक टोळी झाली आहे परंतु एक सर्वाना सांगणे आहे कि जनता आता फसणार नाही. लोकसभा निवडणुकीत स्थानिक बाबींमुळे जरा काही वेगळ्या गोष्टी बघायला मिळाल्या आहेत. साखरवाडी परिसरात विरोधकांचे काही एक योगदान नाही. भूमिपुत्रांच्या विषयी खोटा कळवळा आता निवडणुकीमुळे विरोधकांना आला आहे. कमिन्स कंपनी मध्ये काम करताना आधी गुणवत्ता बघितली जाते त्यानंतर शिफारस बघितली जाते. लोणंद मध्ये असलेली सोना कंपनी का गेली हे बघणे गरजेचे आहे.
साखरवाडी कारखान्याने अनेक स्थितंतरे बघितली आहेत. आज अनेक विकासकांनाच भूमिपूजन समारंभ आयोजित करण्यात आला होता. आज श्री दत्त इंडिया कारखाना हा तब्ब्ल १० हजार क्रशिंग करत आहे. या कारखान्याचा इतिहास हा दत्त इंडिया कडे येण्यापूर्वी सुस्थितीत चालत नव्हता. यामध्ये अनेक आरोप प्रत्यारोप होत असतात. प्रल्हाद पाटील यांच्या व्यवस्थापनामुळे हा कारखाना बंद पडला. त्यांच्या व्यवस्थापनाच्या विरोधात विविध बँका ह्या NCLT मध्ये गेले होते. आणि त्यामधून दत्त इंडिया यांनी हा कारखाना घेतल्याने १० हजार क्रशिंग सुरु होत आहेत. श्री दत्त इंडियाने कारखाने कसा चालवायचा हे आदर्श उदाहरण उभे केले आहे. यामध्ये श्री दत्त इंडियाच्या माध्यमातून या ठिकाणी डिस्टलरी, कोजनरेशन, पोत्याचा कारखाना सुरु करण्यात आला आहे. प्रल्हाद पाटील यांनी हा कारखाना त्यांनी विकत घेताना किती रुपयाला विकत घेतला होता हे जाहीर करावे. या सर्व बाबींचा विचार करता याचा सर्वात मोठा लाभार्थी हे प्रल्हाद पाटील हे आहेत. श्रीमंत रामराजे यांच्यामुळे ते आज जिवंत आहेत; नाहीतर त्यांना कर्जाच्या पायामध्ये आत्महत्या करावी लागली असती; हे लक्षात ठेवणे गरजेचे आहे. आता बाहेरच्या कार्यक्षेत्रात आपल्या तालुक्यातील कारखाने जाऊ लागले आहे. श्रीरामची अवस्था पूर्वी फार बिकट होती. यामध्ये श्रीराम व दत्त इंडिया हे कारखाने व्यवस्थित सुरु करण्यात श्रीमंत रामराजे यांचे मोलाचे योगदान आहे; असे मत यावेळी श्रीमंत संजिवराजे यांनी व्यक्त केले.
यावेळी बोलताना श्रीमंत संजीवराजे म्हणाले की; कमिन्स कंपनी मध्ये आमची नावे घेता येत नाहीत म्हणून दुसऱ्याची नावे घेऊन स्टंट करण्याचे काम काही भावी आमदार करीत आहेत. कमिन्स म्हणजे स्वतःचे दुकान नाही कि त्याला टाळे ठोकता येईल. फलटण तालुक्यात चांगल्या उद्योगांसाठी पोषक वातावरण तयार झाले आहे ते टिकवणे आता गरजेचे आहे. हे उद्योग आपण अजून कसे येतील हे पाहणे गरजेचे आहे. सातारा, शिरवळ, लोणंद येथे असणाऱ्या MIDC बघा तिथे उद्योग कसे सुरु आहेत. जो अडचणीत आणत आहे त्याला थांबवणे गरजेचे आहे. फलटण तालुक्यामधील पाण्याचे किचकट प्रश्न सोडवण्याचे काम हे श्रीमंत रामराजे यांनी केले आहे. त्यामुळे या विधानसभेला तालुक्याची बसलेली घडू विस्कटू देऊ नका. तालुक्याची जी घडी व्यवस्थित सुरु आहे तीच कायम राहू द्या ती विस्कटू देऊ नका.
यावेळी लक्ष्मण नाईक निंबाळकर, राजेंद्र गायकवाड यांनी आपली मनोगते व्यक्त केली. प्रास्ताविक व आभार शंकर माडकर यांनी केले.
साखरवाडीत गणेश मंडप सुद्धा भरला नाही….
साखरवाडी येथे असणाऱ्या श्री गणेश मंडप मध्ये जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सभा संपन्न होईपर्यंत सुद्धा श्री गणेश मंडप मध्ये नागरिकांची गर्दी झाली नव्हती. पुढे गर्दी सोडून पाठीमागे मोकळा हॉल उपस्थितांना दिसत होता.