फलटण: मान्सून लांबल्याने पाणीटंचाई – अर्थकारणाला मोठा दणका

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा

राज्यात मान्सून लांबल्याने फलटण व कोळकी परिसरात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. पाण्याचा प्रश्न गंभीर झाल्याने स्थानिक अर्थकारणाला फटका बसण्याची शक्यता आहे.

स्थैर्य, फलटण, दि. १८ जून : महाराष्ट्रात जून महिन्याचा तिसरा आठवडा उजाडला तरी मान्सून पूर्णपणे सक्रिय झालेला नाही. पावसाने दडी मारल्यामुळे नद्यांचे पाणी आटले असून कालवेही बंद झाले आहेत. परिणामी, फलटण शहर व तालुक्यात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. पावसाअभावी शेतकरी हवालदिल झाला असून याचा थेट परिणाम स्थानिक बाजारपेठेवर आणि अर्थकारणावर होण्याची दाट शक्यता आहे.

पाणीटंचाईच्या झळा; कोळकीत पाचव्या दिवशी पाणी

पाऊस लांबल्याने सर्वसामान्य नागरिकांना पाण्यासाठी मोठी वणवण करावी लागत आहे. फलटण शहरात दररोज होणारा पाणीपुरवठा आता एक दिवसाआड करण्यात आला आहे. शहराचे उपनगर समजल्या जाणाऱ्या कोळकी गावात परिस्थिती अधिकच विदारक असून, तेथे सलग चार दिवसांचा खंड देऊन पाचव्या दिवशी पाणीपुरवठा होत आहे. अनेक वाड्या व वस्त्यांवर पाण्याचे टँकर सुरू करण्यात आले आहेत. आगामी काळात पाऊस न पडल्यास ही स्थिती अधिकच गंभीर होण्याची भीती आहे.

शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले

खरिपाच्या हंगामात पावसाने पाठ फिरवल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आले आहे. पेरण्या खोळंबल्या असून पिकांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. हवामान विभागाच्या ताज्या अंदाजानुसार, सध्या अरबी समुद्रातील प्रवाह कमकुवत असल्याने आणि उष्ण वाऱ्यांमुळे मान्सूनची वाटचाल थांबली आहे. राज्यामध्ये २५ जूननंतर मान्सून पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी वर्तवली आहे.

स्थानिक अर्थकारणाला फटका

फलटण तालुक्याची संपूर्ण बाजारपेठ आणि अर्थकारण हे पूर्णपणे शेतीवर अवलंबून आहे. जर शेतकऱ्याच्या खिशात पैसे आले, तरच स्थानिक व्यवसाय योग्य प्रकारे चालतात. मात्र, पावसाअभावी पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडेल. याचा थेट फटका तालुक्यातील सर्वच व्यवसायांना बसेल आणि संपूर्ण बाजारपेठ मंदीच्या खाईत लोटली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्वच स्तरांतून वरुणराजाच्या आगमनाची आतुरतेने वाट पाहिली जात आहे.

Back to top button
Don`t copy text!