
दैनिक स्थैर्य | दि. ४ ऑगस्ट २०२६ | सोलापूर |
कोण संजय राऊत? मी त्यांना ओळखत नाही, अशा उपरोधिक शब्दांत सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांच्या आक्रमक टीकेला पूर्णपणे दुर्लक्षित केले. राऊत यांच्या विधानाला थेट उत्तर न देता, त्यांना राजकीयदृष्ट्या ‘अपरिचित’ ठरवून खिजवण्याचा डाव गोरेंनी टाकला असून, त्यांच्या या एकाच विधानाने जिल्ह्यातील राजकीय वातावरणात आणखी ठिणगी पडली आहे.
रविवारी सायंकाळनंतर सोलापूर दौर्यावर आलेल्या सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी माध्यमांशी बोलताना खासदार राऊत यांच्या वक्तव्याला फारसे महत्त्व देणार नसल्याचे स्पष्ट केले. मात्र, संजय राऊत यांनी पालकमंत्र्यांविरोधात केलेल्या कथीत आक्षेपार्ह आणि बेताल विधानावरून भाजप आक्रमक झाला आहे. राऊत यांच्या या विधानामुळे संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात भाजप विरुद्ध ठाकरे गट असा थेट संघर्ष पेटला असून दोन्ही बाजूंचे कार्यकर्ते आमनेसामने आले आहेत.
खासदार राऊत यांच्या वक्तव्याचे तीव्र पडसाद शहरासह संपूर्ण जिल्ह्यात उमटले. भाजप युवा मोर्चातर्फे चार हुतात्मा पुतळा चौकात राऊत यांच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी करत त्यांच्या प्रतिमेचे दहन करण्यात आले. याशिवाय पंढरपूर, मोहोळ, अकलूज, अनगर आणि सांगोला येथेही निदर्शने करण्यात आली. सांगोला येथे बळीराजा पाणंद रस्ते समितीचे अध्यक्ष माजी जिल्हा परिषद सदस्य अॅड. सचिन देशमुख यांनी राऊत यांच्या विधानाचा निषेध केला. अनेक, ठिकाणी राऊत यांच्या प्रतिमेला काळे फासून परिसर परिसर दणाणून सोडला. भाजप आमदार देवेंद्र कोठे यांनीही राऊत यांच्या वक्तव्याचा समाचार घेत त्यांच्यावर घणाघाती टीका केली.
तब्बल ३३ दिवसांनंतर सोलापूरातून मुंबईकडे झेपावले विमान
दरम्यान, भाजपचे स्वीकृत नगरसेवक मनीष केत यांच्या फिर्यादीवरून फौजदार चावडी पोलिस ठाण्यात खासदार राऊत यांच्या विरोधात शांतता भंग करणे आणि अब्रूनुकसानीचा अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईनंतर रविवारी रात्री ठाकरे गटाच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी पोलिस ठाण्यात गर्दी करत भाजपवर सूडबुद्धीने कारवाई केल्याचा आरोप केला. सोमवारी भाजप महिला आघाडीतर्फे राऊत यांच्याविरोधात रस्त्यावर उतरून मोठे आंदोलन करण्याची तयारी सुरू आहे. तर दुसरीकडे, ठाकरे गटाकडूनही भाजपच्या या दबावाला आक्रमक प्रत्युत्तर देण्याची हालचाल सुरू झाली आहे. पालकमंत्र्यांच्या या टोलेबाजीनंतर आणि दाखल गुन्ह्यांनंतर सोलापुरातील हा राजकीय कलगीतुरा कोणता वळण घेतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
