फलटण: वीर धरण ९७ टक्के भरले – नदीपात्रात पाण्याचा विसर्ग

नीरा प्रणालीतील वीर धरण ९७ टक्के भरले असून नदीपात्रात ४,६३७ क्युसेक्स विसर्ग सुरू आहे. भाटघर, नीरा देवघर धरणांतही पाणीसाठ्यात समाधानकारक वाढ झाली आहे.

स्थैर्य, फलटण, दि. 23 जुलै : नीरा खोऱ्यातील वीर धरण ९७.१४ टक्के भरले असून धरणातून नीरा नदीपात्रात ४,६३७ क्युसेक्स वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या पावसामुळे नीरा प्रणालीतील धरणांमधील पाणीसाठ्यात वेगाने वाढ होत आहे.

वीर धरणातून नदी व कालव्यात विसर्ग

जलसंपदा विभागाने २३ जुलै रोजी सकाळी ८ वाजता प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार, ९.१४ टीएमसी क्षमतेचे वीर धरण ९७.१४ टक्के भरले आहे. धरणाच्या सांडव्यावरून नीरा नदीपात्रात ४,६३७ क्युसेक्स विसर्ग सोडण्यात येत आहे. याशिवाय नीरा डाव्या कालव्यातून ७०५ क्युसेक्स, तर नीरा उजव्या कालव्यातून १,५५० क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

इतर धरणांमधील पाणीसाठा

पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरू असल्याने इतर धरणांमधील साठ्यातही मोठी वाढ होत आहे. भाटघर धरणात १५.२६ टीएमसी (६४.९२ टक्के) पाणीसाठा झाला असून २४ तासांत तेथे १६ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. नीरा देवघर धरणात ८.५३ टीएमसी (७२.७५ टक्के) साठा जमा झाला असून ६२ मि.मी. पाऊस पडला आहे. गुंजवणी धरणात २.७७ टीएमसी (७५.०२ टक्के) पाणीसाठा असून तेथे ७० मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. नाझरे धरणात ०.२७ टीएमसी (४५.४५ टक्के) पाणी साठले आहे.

Back to top button
Don`t copy text!