फलटण तालुका सकल धनगर समाज बांधवांचे सोमवारी ‘रास्ता रोको’ आंदोलन

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य | दि. २१ सप्टेंबर २०२४ | फलटण |
राज्य सरकार धनगर समाजाला आरक्षण देण्याच्या मानसिकतेमध्ये आहे. सरकारवरील दबाव वाढविण्यासाठी व पंढरपूर येथे बसलेल्या उपोषणकर्त्यांना नैतिक पाठबळ देण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रभर सोमवार, दि. २३ सप्टेंबर २०२४ रोजी रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार असल्याचे फलटण तालुका सकल धनगर समाज बांधव संघटनेने सांगितले आहे.

धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलतीची अंमलबजावणी व्हावी म्हणून गेली १३ दिवस पंढरपूर येथे धनगर समाज बांधव आमरण उपोषणाला बसले आहेत. त्यामधील अनेक उपोषणकर्त्यांची तब्येत खालावली आहे. आरक्षणासाठी हे सर्वजण जीवाची बाजी लावून लढत आहेत. धनगर समाजाला आरक्षण मिळावे म्हणून एसटी आरक्षणाची लढाई शेवटच्या टप्प्यावर आलेली आहे.

या पार्श्वभूमीवर फलटण तालुका धनगर समाज बांधवांच्या वतीने फलटण येथील क्रांतिसिंह नाना पाटील चौक येथे सोमवारी सकाळी ११ वाजता ‘रास्ता रोको’ आंदोलन करण्यात येणार आहे. तसेच मंगळवार दि. २४ सप्टेंबर रोजी महाराष्ट्रातून सर्व धनगर समाज पंढरपूर येथे एकवटणार आहेत.


Back to top button
Don`t copy text!