दैनिक स्थैर्य | दि. २१ सप्टेंबर २०२४ | फलटण |
मुधोजी महाविद्यालय, फलटण येथील मराठी विभागप्रमुख तसेच श्रीमंत मालोजीराजे सह. बँकेचे विद्यमान संचालक प्रोफेसर डॉ. प्रभाकर पवार यांना सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय आणि कार्पोरेट व्यवहार मंत्रालय भारत सरकार, नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने इन्स्टिट्यूट ऑफ स्कॉलर्सअंतर्गत देण्यात येणारा ’ ‘अकॅडमिक एक्सलन्स अवॉडर्र्-२०२४’ देण्यात आला आहे.
दरवर्षी इन्स्टिट्यूट ऑफ स्कॉलर्स उच्च शैक्षणिक संस्थांसाठी प्लेसमेंट, संशोधन, पायाभूत सुविधा आणि शैक्षणिक या चार श्रेणीमध्ये पुरस्कार जाहीर करते. ‘अकॅडमिक एक्सलन्स अवॉर्ड’ हा पुरस्कार अध्यापनातील उत्कृष्टतेसाठी, अध्यापन व्यावसायिकांना ओळखण्यासाठी, संशोधन प्रकल्पामध्ये विद्यार्थ्यांसोबत सहयोग, व्यावसायिक क्रियाकल्पामध्ये विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग, चांगला शैक्षणिक रेकॉर्ड, त्यांच्या कौशल्यांच्या क्षेत्रातील वाढ आणि यश यासाठी देण्यात येतो.
प्रोफेसर डॉ. प्रभाकर पवार यांनी आतापर्यंत नॅशनल, इंटरनॅशनल, आयएसएसएन नंबर असणार्या नियतकालिकांतून ५० हून अधिक शोधनिबंध लिहून प्रकाशित केलेले आहेत. अनेक पुस्तकांना प्रस्तावना लिहिलेल्या असून विविध राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय चर्चासत्रात साधन व्यक्ती व अध्यक्ष म्हणून मार्गदर्शन केलेले आहे.ते श्रीमंत मालोजीराजे सहकारी बँकेत विद्यमान संचालक असून शिवाजी विद्यापीठाच्या मराठी अभ्यास मंडळाचे माजी सदस्य म्हणून अभ्यासक्रम तयार करण्याचे पाच वर्षे काम केलेले आहे. सध्या ते मुधोजी महाविद्यालयात पदवी व पदव्युत्तर वर्गांना मराठी विषयाचे अध्यापनाचे कार्य करत आहेत. ते शिवाजी विद्यापीठांतर्गत पीएच.डी.चे गाईड आहेत.
पवार यांच्या यशाबद्दल आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, प्राचार्य विश्वासराव देशमुख, प्राचार्य.अरविंद निकम, प्राचार्य प्रोफेसर डॉ. पंढरीनाथ कदम तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक- प्राध्यापिका, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी-विद्यार्थिनींसह विविध स्तरांतून अभिनंदन होत आहे.