
फलटण उपजिल्हा रुग्णालयातील एका डॉक्टरची कथित सुसाइड नोट सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे.
स्थैर्य, फलटण, दि. ३० जुलै : फलटण उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या एका डॉक्टरने आत्महत्येचा इशारा दिल्याची कथित डायरी नोट आणि हातावर लिहिलेल्या मजकुराचा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. या घटनेमुळे आरोग्य वर्तुळात तसेच संपूर्ण फलटण तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.
कथित पत्रातील आरोप
व्हायरल होत असलेल्या मजकुरानुसार, बंदूक परवान्यासाठी आवश्यक असलेल्या फिटनेस प्रमाणपत्राच्या संदर्भात झालेल्या वादानंतर एका माजी मंत्र्यांच्या पीएने अरेरावी करून धमकी दिल्याचा आणि वैद्यकीय अधीक्षक यांच्याकडे तक्रार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यावरून चौकशीला बोलावल्याने मानसिक त्रास होत असून योग्य कारवाई न झाल्यास आत्महत्येचा इशारा दिल्याचे कथित पत्रात नमूद आहे.
अधिकृत पुष्टीची प्रतीक्षा
या कथित सुसाइड नोटची सत्यता तसेच ती संबंधित डॉक्टरनेच लिहिली आहे का, याबाबत अद्याप कोणताही अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. याशिवाय उपजिल्हा रुग्णालय प्रशासन, जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालय अथवा पोलीस प्रशासनाकडून कोणतीही अधिकृत भूमिका जाहीर करण्यात आलेली नाही.
प्रकरणाची सत्यता समोर येण्यासाठी पोलीस आणि संबंधित प्रशासकीय यंत्रणांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून वस्तुस्थिती स्पष्ट करावी, अशी मागणी केली जात आहे.