फलटण: नगरपरिषद कर गैरव्यवहार प्रकरणी चौकशी समिती – जिल्हाधिकाऱ्यांचा दणका

फलटण नगरपरिषदेच्या कर विभागातील कथित गैरव्यवहाराची गंभीर दखल घेत सातारा जिल्हाधिकाऱ्यांनी ५ सदस्यांची उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे.

स्थैर्य, फलटण, दि. ३० जुलै : फलटण नगरपरिषदेच्या कर विभागामध्ये झालेल्या कथित भ्रष्टाचार प्रकरणाची सातारा जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणाच्या चौकशीसाठी ५ सदस्यांची जिल्हास्तरीय विशेष समिती स्थापन करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. वेळेत चौकशी अहवाल न आल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी हे कडक पाऊल उचलले आहे.

अहवाल सादर न केल्याने जिल्हास्तरीय कारवाई

नगरपरिषदेतील कथित कर गैरव्यवहाराबाबत वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी ११ जुलै रोजी मुख्याधिकारी निखिल जाधव यांना चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते. तसेच सर्व संबंधित डिजिटल पुरावे आणि कागदपत्रे सुरक्षित ठेवण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र, प्रशासनाकडून निर्धारित वेळेत अहवाल प्राप्त न झाल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी थेट जिल्हास्तरीय समिती गठित केली आहे.

५ सदस्यीय समितीची नियुक्ती

नगरपरिषद प्रशासन शाखेचे जिल्हा सहआयुक्त अभिजित बापट यांच्या अध्यक्षतेखाली ही चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीत जिल्हा कोषागार अधिकारी आरती नांगरे, लेखाधिकारी शीतल करंजेकर, नगरपरिषद प्रशासन शाखेचे अधीक्षक अक्षय माने आणि लेखापरीक्षक विशाल इथापे यांचा समावेश आहे.

या समितीला कर विभागातील कारभाराची सखोल चौकशी करून लवकरात लवकर वस्तुस्थितीदर्शक अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांच्या या थेट हस्तक्षेपामुळे पालिका वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून संबंधितांवर जबाबदारी निश्चित होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Back to top button
Don`t copy text!