
धुळदेव विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या मतदानासाठी गणेशराव धायगुडे यांच्या नावाचा ठराव मंजूर झाल्याने अनिकेतराजे नाईक निंबाळकर यांचा पुन्हा पराभव झाला.
स्थैर्य, धुळदेव, दि. २९ जुलै : फलटण तालुक्यातील धुळदेव येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या प्रतिनिधी निवडीच्या ठरावात श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर यांचा पराभव झाला आहे. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे समर्थक गणेशराव धायगुडे यांच्या नावाचा ठराव ८ विरुद्ध ५ अशा बहुमताने मंजूर करण्यात आला. एकूण १३ संचालक मंडळापैकी ८ संचालकांनी गणेशराव धायगुडे यांना मतदान केले आहे तर ५ मते ही श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर यांना मिळाली आहेत.
श्रीमंत अनिकेतराजेंना पुन्हा राजकीय धक्का
फलटण नगरपालिकेच्या लोकनियुक्त नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत पराभव झाल्यानंतर, आता जिल्हा बँकेच्या पार्श्वभूमीवर श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर यांना पुन्हा एकदा राजकीय दणका बसला आहे. राजे गटाकडून श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर यांच्या नावाचा ठराव मांडण्यात आला होता. मात्र, संचालक मंडळाने धायगुडे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले.
सहकार क्षेत्रात भाजपची ताकद
ठराव मंजुरीच्या वेळी विरोधी गटाकडून अडथळे आणण्याचा प्रयत्न झाला, तरीही कायदेशीर प्रक्रिया पार पडली. धुळदेव सोसायटीच्या या निकालामुळे आगामी जिल्हा बँक निवडणुकीच्या तोंडावर तालुक्यातील राजकीय समीकरणांना नवी दिशा मिळाली आहे.
धायगुडे यांच्या निवडीबद्दल माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार सचिन पाटील आणि युवा नेते अभिजित नाईक निंबाळकर यांनी सर्व संचालक व कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले.
