फलटण: नीरा खोऱ्यातील धरणांत ८२ टक्के साठा – नदीकाठच्या गावांना इशारा

नीरा खोऱ्यातील धरणांत ८२ टक्के साठा झाला असून वीर धरण १०० टक्के भरले आहे. नदीपात्रात १५ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.

स्थैर्य, फलटण, दि. 25 जुलै : नीरा खोऱ्यात सुरू असलेल्या पावसामुळे धरणांच्या पाणीसाठ्यात वेगाने वाढ होत आहे. प्रमुख चार धरणांमध्ये एकूण ८२.८२ टक्के पाणीसाठा उपलब्ध झाला असून, वीर धरण १०० टक्के भरले आहे. वीर धरणातून नीरा नदीपात्रात १५,०११ क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

वीर धरणातून विसर्ग वाढवला

वीर धरणाची पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी धरणाच्या सांडव्यावरून १३,९११ क्युसेक आणि अतिवाहकाद्वारे १,१०० क्युसेक असा एकूण १५,०११ क्युसेक विसर्ग नीरा नदीपात्रात सोडण्यात येत आहे. पावसाच्या प्रमाणानुसार आणि धरणातील पाण्याच्या आवकेनुसार या विसर्गामध्ये पुन्हा घट किंवा वाढ होण्याची शक्यता जलसंपदा विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी वर्तवली आहे. नागरिकांनी नदीपात्रात उतरू नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

धरणांमधील पाणीसाठ्याची सद्यस्थिती

नीरा प्रणालीतील प्रमुख चारही धरणांमध्ये मिळून ४०.०२८ टीएमसी (८२.८२ टक्के) उपयुक्त पाणीसाठा जमा झाला आहे. गतवर्षी याच काळात हा साठा ४०.८९६ टीएमसी (८४.६२ टक्के) इतका होता. चारही धरणांत मिळून एकूण ३.९६३ टीएमसी पाण्याची नव्याने आवक झाली आहे.

सध्या भाटघर धरणात १७.८३७ टीएमसी (७५.९० टक्के), नीरा देवघर धरणात ९.५८६ टीएमसी (८१.७२ टक्के) आणि गुंजवणी धरणात ३.१९८ टीएमसी (८६.६६ टक्के) पाणीसाठा उपलब्ध आहे. नीरा देवघर आणि गुंजवणी धरण क्षेत्रात पावसाचा जोर कायम असून अनुक्रमे ६५ मि.मी. व ६२ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. भाटघर धरण क्षेत्रात १३ मि.मी. पाऊस पडला आहे.

Back to top button
Don`t copy text!