
श्रीराम एज्युकेशन सोसायटीच्या वतीने संस्थेचे संस्थापक नामदेवराव सूर्यवंशी यांच्या ३१ व्या स्मृतिदिनानिमित्त त्यांना फलटणमध्ये विनम्र आदरांजली वाहण्यात आली.
स्थैर्य, फलटण, दि. 17 जुलै : श्रीराम एज्युकेशन सोसायटीच्या यशवंतराव चव्हाण हायस्कूल, वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूल, नामदेवराव सूर्यवंशी महाविद्यालय आणि वेणूताई चव्हाण डी. फार्मसी कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने नामदेवराव सूर्यवंशी (बेडके) यांच्या ३१ व्या स्मृतिदिनानिमित्त त्यांना विनम्र आदरांजली वाहण्यात आली.
मान्यवरांची उपस्थिती
याप्रसंगी श्रीराम एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष सी. एल. पवार, मानद सचिव सचिन सूर्यवंशी, महेंद्र सूर्यवंशी, शिवाजीराव सूर्यवंशी, हणमंतराव निकम आणि रिद्धिमान सूर्यवंशी यांच्या हस्ते नामदेवराव सूर्यवंशी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी प्राचार्या एन. एम. गायकवाड, व्ही. के. सुरवसे, प्रभारी प्राचार्या टी. व्ही. रायते आणि उपप्राचार्य पी. डी. घनवट उपस्थित होते.
शैक्षणिक क्षेत्रातील योगदान
संस्थेच्या नियामक मंडळाचे सदस्य महेंद्र सूर्यवंशी यांनी नामदेवराव सूर्यवंशी यांच्या जीवनातील आठवणींना उजाळा दिला. फलटण पंचक्रोशीमध्ये ज्ञानाची बीजे रोवण्याचे काम त्यांनी केले. त्यांनी लावलेल्या रोपट्याचे वटवृक्षामध्ये रूपांतर संस्थेचे माजी अध्यक्ष सुभाषराव सूर्यवंशी यांनी केले, असे महेंद्र सूर्यवंशी म्हणाले.
या कार्यक्रमासाठी संस्थेच्या सर्व शाखांचे प्राचार्य, उपप्राचार्य, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आणि पालक उपस्थित होते. याच्या यशस्वी नियोजनासाठी एन. एम. गायकवाड, पी. डी. घनवट व सर्व विभागप्रमुखांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एस. डी. यादव यांनी केले. एस. एन. राऊत यांनी प्रास्ताविक केले, तर आर. एस. सस्ते यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले.