फलटण: रात्रीच्या वेळी नगराध्यक्ष रस्त्यावर – पोल तातडीने बदलण्याचे आदेश

फलटण शहरातील सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी मध्यरात्री विविध भागांची पाहणी करत धोकादायक विद्युत पोल बदलण्याचे निर्देश दिले.

स्थैर्य, फलटण, दि. ३० जुलै : नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने फलटण नगरपरिषदेचे नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी मध्यरात्री ११ वाजता अचानक शहरातील विविध भागांची पाहणी केली. यावेळी नाना पाटील चौक येथील विद्युत पोल तातडीने हटवून त्याठिकाणी नवीन आणि सुरक्षित पोल उभारण्याचे आदेश त्यांनी संबंधित विभागाचे अधिकारी व ठेकेदाराला दिले.

कामात हलगर्जीपणा खपवून घेणार नाही

पाहणीदरम्यान शहरातील रस्ते, पथदिवे आणि सुरू असलेल्या विविध विकासकामांची गुणवत्ता व वेगाबाबत त्यांनी आढावा घेतला. नागरिकांच्या सुरक्षेशी संबंधित कामांमध्ये कोणताही विलंब किंवा हलगर्जीपणा सहन केला जाणार नाही, असा थेट इशारा नाईक निंबाळकर यांनी दिला. माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व आमदार सचिन पाटील यांनी दिलेल्या सूचनांनुसार ही मोहीम राबवली जात असल्याचे त्यांनी सांगितले.

धोकादायक ठिकाणांची माहिती देण्याचे आवाहन

नागरिकांची सुरक्षितता आणि मूलभूत सुविधा हे नगरपरिषदेचे सर्वोच्च प्राधान्य आहे. शहरात धोकादायक अवस्थेतील विद्युत पोल किंवा झाडे असल्यास त्याची माहिती नागरिकांनी नगरपरिषदेला द्यावी, असे आवाहन नाईक निंबाळकर यांनी केले. या अचानक पाहणीमुळे पालिका प्रशासनातील अधिकारी सतर्क झाले असून शहरातील धोकादायक ठिकाणांची विशेष तपासणी मोहीम हाती घेण्यात येणार आहे.

Back to top button
Don`t copy text!