
सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर फलटण सोसायटीच्या प्रतिनिधी पदी रणजितसिंह नाईक निंबाळकर गटाचे दत्तात्रय शिंदे यांची बिनविरोध निवड झाली.
स्थैर्य, फलटण, दि. ३० जुलै : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर फलटण ग्राम विविध विकास कार्यकारी सोसायटीच्या मतदार प्रतिनिधी निवडीच्या बैठकीत माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व आमदार सचिन पाटील गटाचे दत्तात्रय सदाशिव शिंदे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवड झाल्यानंतर युवा नेते अमरसिंह नाईक निंबाळकर यांच्या हस्ते शिंदे यांचा सत्कार करण्यात आला.
विरोधी गटाला मोठा राजकीय धक्का
ठाकूरकी, फरांदवाडी, वाठार निंबाळकर व शहराचा कणा मानल्या जाणाऱ्या फलटण सोसायटीमध्ये यापूर्वी खासदार गटाचे स्पष्ट वर्चस्व नव्हते. मात्र, एकूण १३ संचालकांपैकी ३ संचालक अनुपस्थित राहिल्यानंतर शिल्लक १० संचालकांपैकी ८ संचालकांनी खासदार गटाच्या बाजूने कौल दिला. या निर्णयामुळे जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या तोंडावर तालुक्यातील राजकीय समीकरणांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
विविध मान्यवरांची उपस्थिती
प्रतिनिधी निवडीच्या या महत्त्वपूर्ण बैठकीस नंदकुमार नाळे, बंडू शिंदे, विजय शिंदे, आप्पासाहेब शिंदे, आप्पासाहेब घनवट, सागर काळुखे, अशोक बोडरे, दिलीपराव शिंदे, राजेंद्र शिंदे, नंदकुमार शिंदे, विठ्ठल हिंगणे, शनेश शिंदे, अमोल शिंदे, जोतिराम घनवट आणि प्रताप शिंदे यांच्यासह सोसायटीचे सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. फलटण सोसायटीतील या वर्चस्वामुळे आगामी जिल्हा बँक निवडणुकीतील चुरस अधिक वाढली आहे.