
नगरपरिषदेच्या कर वसुलीतील लाखांहून अधिक रकमेचा अपहार केल्याप्रकरणी तीन कर्मचाऱ्यांवर फलटण शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे.
स्थैर्य, फलटण, दि. २९ जुलै : फलटण नगरपरिषदेत मालमत्ता कर, घरपट्टी आणि पाणीपट्टीची रक्कम नागरिकांकडून स्वीकारून ती शासनाकडे जमा न करता स्वतःच्या फायद्यासाठी वापरल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. नगरपरिषदेची व करदात्यांची १ लाख ५० हजार ३९९ रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी तीन कर्मचाऱ्यांवर फलटण शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कर वसुलीत १.५० लाखांची हेराफेरी
नगरपरिषदेचे सहायक कर निरीक्षक जगदीश माळी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, १५ मार्च २०२२ ते २२ जुलै २०२६ या कालावधीत हा अपहार झाला. नगरपरिषदेतील कर्मचारी प्रदीप अरुण काकडे, नितीन देवदास वाळा आणि शरद माधव अहिवाळे (सर्व रा. फलटण) यांनी नागरिकांकडून वेलोवेळी कराची रक्कम वसूल केली. मात्र, ही रक्कम पालिकेच्या तिजोरीत जमा न करता स्वतःच्या फायद्यासाठी वापरून नगरपरिषद व मालमत्ताधारकांची फसवणूक केली. याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून सहाय्यक पोलीस निरीक्षक मिठू जगदाळे पुढील तपास करत आहेत.
संशयित फसवणूक झाल्यास तक्रार करण्याचे आवाहन
ज्या नागरिकांनी यापूर्वी फलटण नगरपालिकेत मालमत्ता कर, घरपट्टी, पाणीपट्टी अथवा इतर कर भरला आहे, परंतु अधिकृत पावती मिळाली नसेल किंवा फसवणूक झाल्याची शंका असल्यास त्यांनी तत्काळ पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवावी. तसेच नागरिकांनी पोलीस निरीक्षक घनशाम बल्लाळ (९८८११४९६०१) किंवा सहाय्यक पोलीस निरीक्षक मिठू जगदाळे (९०२११९६०२२) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
