फलटण: खंडणी प्रकरणातील फरार संशयित आरोपी दोन महिन्यांनी जाळ्यात

फलटण शहरातील हेअर कटिंग सलूनमध्ये घुसून शस्त्राचा धाक दाखवून खंडणी मागणाऱ्या प्रकरणातील दोन महिन्यांपासून फरार असलेल्या संशयित आरोपीला स्थानिक डी.बी. पथकाने शिताफीने अटक केली आहे.

स्थैर्य, फलटण, दि. २९ जुलै : फलटण शहरातील किंग युनिसेक्स पार्लर या हेअर कटिंगच्या दुकानामध्ये घुसून मारहाण करत दरमहा १० हजार रुपयांची खंडणी मागणाऱ्या प्रकरणातील फरार संशयित आरोपीला फलटण शहर पोलीस स्टेशनच्या डी.बी. पथकाने अटक केली आहे. अक्षय संजय जाधव (रा. मलठण, ता. फलटण) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे.

हेअर कटिंग पार्लरमध्ये उघडपणे राडा

१९ मे २०२६ रोजी सायंकाळी ५ च्या सुमारास संशयित आरोपी दुचाकीवरून दुकानासमोर आले होते. त्यांनी दुकानामध्ये घुसून हातातील धारदार लोखंडी शस्त्राचा धाक दाखवत “मला अभि भाई म्हणतात, दुकान चालू केले आहे तर दरमहा १० हजार रुपये हप्ता दे” अशी धमकी दिली होती. तसेच दुकानदारासह कर्मचाऱ्यांना मारहाण करून दुकानातील साहित्याची तोडफोड केली होती.

डी.बी. पथकाची धडाकेबाज कामगिरी

या प्रकरणातील मुख्य संशयित अभिजीत अरुण जाधव याला पोलिसांनी यापूर्वीच अटक केली होती. मात्र, त्याचा साथीदार अक्षय जाधव घटना घडल्यापासून फरार होता. पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर, उपविभागीय पोलीस अधिकारी धन्यकुमार गोडसे आणि पोलीस निरीक्षक घनशाम बल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली डी.बी. पथकाने गुप्त बातमीदाराच्या आधारे अक्षय जाधव याच्यावर सतत पाळत ठेवून त्याला शिताफीने ताब्यात घेतले. ही कारवाई पोलीस हवालदार संतोष नाळे, जितेंद्र टिके आणि अतुल बडे यांनी केली.

Back to top button
Don`t copy text!