फलटण: मलठण व जिंती नाका परिसरात नगरपरिषदेच्या पदाधिकाऱ्यांची पाहणी – विविध निर्देश जारी

नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांच्या आदेशानुसार मुख्याधिकारी आणि विविध समित्यांच्या सभापतींनी केली पाहणी. स्वच्छता आणि पाणीपुरवठ्याबाबत प्रशासनाला दिले महत्त्वाचे निर्देश.

स्थैर्य, फलटण, दि. १० जून : फलटण नगरपरिषदेचे नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांच्या आदेशानुसार मुख्याधिकारी निखिल जाधव, आरोग्य समितीचे सभापती सचिन अहिवळे, पाणीपुरवठा सभापती राहुल निंबाळकर आणि नगरसेवक रोहित नागटिळे यांनी मलठण आणि जिंती नाका परिसरातील सार्वजनिक स्वच्छतागृहे, ड्रेनेज लाईन आणि पाणीपुरवठा व्यवस्थेची प्रत्यक्ष पाहणी केली.

सार्वजनिक स्वच्छतागृहांच्या स्वच्छतेवर भर

पाहणीदरम्यान मुख्याधिकारी निखिल जाधव यांनी प्रशासनाला सार्वजनिक स्वच्छतागृहांची नियमित साफसफाई करण्याचे निर्देश दिले. तसेच, नव्याने मंजूर करण्यात आलेल्या सार्वजनिक स्वच्छतागृहांच्या जागा स्वच्छ करून त्या ठिकाणी दर्जेदार बांधकाम त्वरित सुरू करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत.

पाणीपुरवठा सुरळीत करण्याच्या सूचना

पाणीपुरवठा समितीचे सभापती राहुल निंबाळकर यांनी सदर परिसरातील पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईनची आणि पाणी येण्याच्या वेळेची सविस्तर माहिती घेतली. सर्वसामान्य नागरिकांना नियमित वेळेत आणि योग्य दाबाने पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्याबाबत त्यांनी पाणीपुरवठा विभागाला सक्त निर्देश दिले आहेत.

कचरा संकलन आणि स्वच्छतेचे नियोजन

आरोग्य समितीचे सभापती सचिन अहिवळे यांनी मलठण व परिसरातील कचराकुंड्या नियमित साफ करण्यावर भर दिला. ज्या ठिकाणी नागरिक आणि व्यापाऱ्यांकडून कचरा टाकला जातो, त्या जागांची नियमित स्वच्छता करावी आणि घंटागाडीचे वेळापत्रक नागरिकांच्या सोयीनुसार निश्चित करावे, असे निर्देश त्यांनी आरोग्य विभागाला दिले.

प्रभाग क्रमांक ५ मधील समस्या सुटणार

या पाहणीदरम्यान नगरसेवक रोहित नागटिळे यांनी नागरिकांना आश्वस्त केले. ते म्हणाले की, प्रभाग क्रमांक ५ मध्ये मागील ३० वर्षांपासून प्रलंबित असलेल्या आणि तत्कालीन सत्ताधाऱ्यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्षित केलेल्या समस्या आता तातडीने सोडवल्या जातील. माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार सचिन पाटील आणि नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांच्या माध्यमातून या प्रभागात आता कोणतीही समस्या शिल्लक राहणार नाही, अशी ग्वाही नागटिळे यांनी दिली.

Back to top button
Don`t copy text!