नवी दिल्ली: NEET-UG घोटाळ्याची जबाबदारी स्वीकारत धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा – दिल्लीत राजकीय खळबळ

NEET-UG 2026 परीक्षेतील अनियमिततेची नैतिक जबाबदारी स्वीकारत केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे सोपवला आहे.

स्थैर्य, नवी दिल्ली, दि. २५ जुलै : NEET-UG 2026 परीक्षेतील अनियमितता आणि उद्भवलेल्या वादाची नैतिक जबाबदारी स्वीकारत केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. देशव्यापी वाद आणि विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे राजीनामा पत्र सुपूर्द केले.

परीक्षेतील अनियमिततेमुळे निर्णय

३ मे २०२६ रोजी पार पडलेल्या NEET-UG परीक्षेत अनियमितता समोर आली होती. यानंतर केंद्र सरकारने तातडीने हस्तक्षेप करत या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवला होता. तसेच ही परीक्षा रद्द करून पुन्हा पार पाडण्यात आली. पुढील वर्षापासून ही परीक्षा संगणक आधारित (CBT) पद्धतीने घेण्याचा निर्णयही प्रशासनाने घेतला आहे.

विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी त्याग

धर्मेंद्र प्रधान यांनी प्रसिद्ध केलेल्या निवेदनात स्पष्ट केले की, विद्यार्थ्यांना कायदेशीर अडचणींमध्ये अडकू न देणे आणि युवाशक्तीचा भ्रमनिरास टाळणे ही आपली प्राथमिकता आहे. जंतर-मंतरसह देशभरात निर्माण झालेल्या वातावरणाचा कोणताही राष्ट्रविरोधी घटकांनी गैरफायदा घेऊ नये, यासाठी पद सोडण्याचा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी सांगितले.

चार दशकांच्या योगदानानंतर राजीनामा

गेल्या चार दशकांपासून शिक्षण सुधारणांसाठी कार्यरत असल्याचे सांगत प्रधान यांनी देशाच्या युवाशक्तीवर आपला पूर्ण विश्वास असल्याचे नमूद केले. NEET-UG परीक्षेतील गोंधळामुळे उद्भवलेल्या परिस्थितीची जबाबदारी स्वीकारून त्यांनी आपल्या पदाचा त्याग केला आहे.

Back to top button
Don`t copy text!