आषाढी वारी…

दैनिक स्थैर्य | दि. २५ जुलै २०२६ | फलटण |
आज आषाढी एकादशी, वर्षा ऋतुमध्ये वसुंधरेवर वरुण राजा धो-धो बरसावा आणि रत्नाकर उत्सुंग लाटांच्या शृखलांनी सुशोभित व्हावा, तसा आजचा दिवस…

संत महात्मे आणि वारकरी यांच्या पदस्पर्शाने भिमतीरी उधान आणणारा दिवस. पांडुरंगाच्या दर्शनाची चातकाप्रमाणे वर्षभर आसूसलेल्या तृष्णा तृप्तीचा दिवस. पण विठ्ठल भक्तांमध्ये वारीची ओढ का आहे ? नेमकं काय मिळतं वारीमध्ये ? तर उत्तर मिळतं वारीमध्ये आनंद, उत्साह विठुरायाचं आणि माऊलीचं सानिध्य ! प्रभुदर्शनाची अनुभूती, ईश्वर प्राप्तीचे क्षण, या धावणार्‍या मायारुपी, भौतीक जगापासून अलिप्तता आणि शांती.

जवळपास सर्व धर्मांचं सार म्हणतं की, मनुष्य जन्म दुर्लभ आहे. ८४ लाख योनींच्या भ्रमंतीमधून आपला प्रवास चालु आहे, पण पूर्वजन्माच्या कर्म पुण्याईने जन्म- मृत्यूच्या भवचक्रातून सोडवणूक करण्यासाठी दिलेली सुवर्णसंधी म्हणून मानव जन्म बहाल केला आहे, आणि या मानव जन्माची सार्थकता मोक्षपप्राप्ती, निर्वाणप्राप्ती, ईश्वरप्राप्ती करून घेणे आहे. या भवचक्रातून मुक्ती, दु:खापासून मुक्ती करुन घेणे आहे.

आपले अवतरण होण्याचे कारण म्हणजे आपल्या पूर्वजांची निर्मिती आपण आहोत. किंबहूना आपल्या आजोबा, पणजोबा खापरपणजोबाचे आपण अंश आहोत. त्यांच्या मांसपेशीपासून आपली निर्मिती असल्यामुळे आपण अजोबा, पणजोबााच आहोत. जसा पाण्याचा थेंब सागरापासून अलिप्त राहील्याने तो स्वत:ची ओळख नदी, नाले, ओढा, विहीर, तलावाच्या थेंबाची दाखवत असला तरी तो सागराचा अंश आहे. तसं आपण थेट त्या चेतनेचे, चैतन्याचे, शक्तीचे अंश आहोत. सृष्टी निर्माता, त्या निर्गुण निराकाराचे अंश आहोत. त्याचा वास आपल्यामध्ये त्रिकाळ आहे. तो अंश म्हणजे चोव्याच्या विठ्ठलाच्या विठ्ठलाचा, दशरथ पूत्र रामाच्या रामाचा आहे. तो अंश, प्रवाह चेतनेच्या रुपाने अनंतकाळ आपल्यामध्ये परिभ्रमण करीत आहे, आणि त्या शक्तीला, त्या उर्जेला त्या चेतनेला जाणणे, तिच्याशी एकरूप होणे, तिला साक्षीभावाने न्याहाळणे म्हणजेच मोक्षप्राप्ती, निर्वाणप्राप्ती, भगवंत प्राप्ती होय, आणि अशा अवस्थेत जाणे म्हणजे तल्लीन होणे, मग्न होणे, धूंद होणे, तंद्री लागणे, देहभान विसरुन जाणे म्हणजेच तन-मनाचे आस्तीत्व विसरुन जाणे, ना सूख, ना दुःख अवस्था प्राप्त होणे, निर्विकार, निर्विचार अवस्था प्राप्त होणे ही अवस्था प्राप्तीचे अनेक मार्ग साधू संतांनी, महापुरुषांनी आपल्याला सांगितलेले आहेत. जसे की भक्तीमार्ग, योगमार्ग, ध्यानमार्ग, प्रेममार्ग, नामजप मार्ग, भजन किर्तन मार्ग आणि कर्म मार्ग. या मार्गानी आपण त्या अवस्थेला जाऊ शकतो. त्या चेतनेशी विलीन होऊ शकतो.

जी अवस्था गोरोबाला माती तुडवताना नामस्मरणात, तुकाराम महाराजांना भंडारा डोंगरावर भजनात, मीराला प्रभूचिंतनात, बुध्दांना पिंपळाच्या वृक्षावाली, शिवाला कैलासात प्राप्त झाली. तीच तल्लीनता, तीच तंद्री, तीच मग्नता, तीच ना सुख ना दुःख अवस्था काही अंशी वारीमध्ये पायी चालताना मुखात माऊलीचा नामजप असताना, भजन किर्तनात रंगून जाताना, विठ्ठल दर्शनाच्या ध्यासामध्ये २० दिवस प्राप्त होते, आणि वारकर्‍यांच्या वाट्याला येते २० दिवस हे चैतन्य, ही चेतना, ही शक्ती, ऊर्जा हा जीव, मोह, माया, अहंकार, राग व्देष, मत्सर या शत्रुपांसून अलिप्त ठेवते, आणि आनंदाचे डोही आनंदाचे तरंग उठतात. जसे वसंत ऋतुमध्ये वृक्षवेलींना नवी पालवी फुटावी, नवचैतन्य निर्माण व्हावे, नवसंजीवनी प्राप्त व्हावी, तसे वारकर्‍याचे तन-मन रिचार्ज होऊन पुढील ३४५ दिवस नव्याने जगण्याची उर्मी, ऊर्जा मिळते, शक्ती मिळते म्हणून ही अवस्था प्राप्त करुन घेण्यासाठी वारकरी आसुसलेला असतो. ही अवस्था पुन्हा पुन्हा हवी हवीशी वाटत असते, म्हणनू त्या वारकर्‍याला वारीची ओढ असते, आणि म्हणून पंढरीत वारकर्‍यांची पंढरीनाथाला आळवणी असते.

हे पांडुरंगा…. जसं पौर्णिमेच्या चांदण्यासाठी चकोर पक्षी भूकलेला असतो, तसा हा जीव, ही चेतना, हे चैतन्य मोक्ष प्राप्तीसाठी, प्रभूप्राप्तीसाठी, तुझ्या प्राप्तीसाठी आसूसलेले आहे. माझे लहानपण खेळण्या-बागडण्यात गेले, तारुण्य इंद्रिय सुखापायी षढरपूने नासून गेले आहे, त्यावेळी मला काही उमगले नाही, पण आता वृद्धपणी पैलतीर दिसायला लागला आहे. आता जाग आली आहे. त्यामुळे भगवंता, आता या भक्तावर दया कर, कृपा कर, तुमचे मन थोर करुन आता एकच आस पुरवा की आता जन्म-मरणाच्या येरझार्‍यातून, येणे जाण्याच्या वारीतून मुक्त करा. आता नको मायात गुंतणे आणि आता नको येणे जाणे. आता दर्शन द्यावे, मोक्षप्राप्ती, निर्वाणप्राप्ती मिळावी.
हे विठ्ठला,
रंगून जाऊ दे तुझ्या नाम अमृताने हे
न्हाऊन निघून दे तुझ्या भक्तीरसाने हे तन,
आणि नटू दे सृष्टी, दया, क्षमा, शांती आणि आनंदाने.

प्रभाकर भोसले, मलठण, फलटण
मो. ९८२२४२२९४१

Back to top button
Don`t copy text!