
फलटणमधील प्रमुख रस्त्यांच्या डिवायडरमध्ये शोभेची झाडे लावण्यासाठी नगरपरिषदेने संस्था व नागरिकांना झाडे उपलब्ध करून देण्याचे आवाहन केले आहे.
स्थैर्य, फलटण, दि. १० सप्टेंबर : फलटण शहरातील प्रमुख रस्त्यांच्या डिवायडरमध्ये शोभेची झाडे लावण्याचा निर्णय नगरपरिषदेने घेतला आहे. यासाठी शहरातील विविध संस्था आणि नागरिकांनी शोभेची झाडे उपलब्ध करून देण्यास तयार असल्यास नगरपरिषदेला कळवावे, असे आवाहन फलटणचे नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर व मुख्याधिकारी निखिल जाधव यांनी केले आहे.
प्रमुख रस्त्यांवरील डिवायडरमध्ये लागवड
पिरॅमिड चौक ते गिरवी नाका तसेच डी. एड. कॉलेज चौक ते राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौक (पृथ्वी चौक) आणि नाना पाटील चौक या रस्त्यांमधील डिवायडरमध्ये शोभेची झाडे लावण्यात येणार आहेत. या उपक्रमासाठी विविध संस्था व नागरिकांकडून सहकार्य अपेक्षित आहे.
झाडे देणाऱ्यांना जाहिरात प्रसिद्धीसाठी जागा
ज्या संस्था किंवा नागरिक नगरपरिषदेस शोभेची झाडे उपलब्ध करून देतील, त्यांना योग्य ठिकाणी जाहिरात प्रसिद्ध करण्यासाठी जागा दिली जाणार असल्याचे नगरपरिषदेने स्पष्ट केले आहे.