फलटण-कोरेगाव अ. जा. राखीव मतदारसंघातून होलार समाजाला संधी द्यावी !

महेंद्र गोरे यांची ई-मेलद्वारे मविआकडे मागणी

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. १७ जून २०२४ | फलटण |
होलार समाजाला फलटण-कोरेगाव मतदारसंघातून उमेदवारी मिळाली पाहिजे यासाठी महेंद्र गोरे यांनी महाविकास आघाडीचे शरद पवार, उध्दव ठाकरे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे ई-मेलद्वारे मागणी केली आहे.

यामध्ये त्यांनी सन २००९ सालापासून फलटण-कोरेगाव मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. तेव्हापासून तीनही टर्ममध्ये होलार समाजाला इच्छा असूनही या राखीव मतदार संघाचे प्रतिनिधीत्व करण्याची संधी दिली नाही.

होलार समाजाच्या येणार्‍या विधानसभा निवडणुकीत फलटण-कोरेगाव मतदार संघातील भूमिका निर्णायक ठरणार आहे. कारण होलार समाज यंग ब्रिगेड या सामाजिक संघटनेने येणारी विधानसभा निवडणूक हाती घेतली आहे आणि फलटण- कोरेगाव या राखीव मतदारसंघातून निवडणूक कोणत्याही परिस्थितीत माघार न घेता लढवण्याचा आणि होलार समाजाचा पहिला आमदार विधान भवनात पाठवण्याचा निर्धार केलेला आहे.

होलार समाज हा शिव-फुले-शाहू-आंबेडकर यांना मानणारा तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानावर चालणारा समाज आहे.

होलार समाजाचे सर्व जाती-धर्माशी सलोख्याचे संबंध आहेत. वारंवार महापुरुषांचा अपमान करणार्‍या, जातीधर्मात द्वेष पसरवणार्‍या भाजप व महायुतीच्या उमेदवाराला पराभूत करण्यासाठी महाविकास आघाडीकडून होलार समाजातील सक्षम उमेदवाराला संधी देऊन स्वातंत्र्यकाळापासून आजपर्यंत वंचित समाजाला न्याय द्यावा, अशी मागणी केली आहे.


Back to top button
Don`t copy text!