
युनायटेड वेस्टर्न बँकेचे संस्थापक कै. अण्णासाहेब चिरमुले यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा २०२५ चा मानाचा ‘चिरमुले पुरस्कार’ ज्येष्ठ पर्यावरणशास्त्रज्ञ पद्मभूषण दिवंगत माधवराव गाडगीळ यांना मरणोत्तर प्रदान करण्यात आला आहे.
स्थैर्य, सातारा, दि. २६ : युनायटेड वेस्टर्न बँकेने बँकेचे संस्थापक कै. वा. ग. चिरमुले यांच्या स्मरणार्थ स्थापन केलेल्या ‘वा. ग. तथा अण्णासाहेब चिरमुले चॅरिटेबल ट्रस्ट’तर्फे दिला जाणारा प्रतिष्ठेचा ‘चिरमुले पुरस्कार’ जागतिक कीर्तीचे ज्येष्ठ पर्यावरणशास्त्रज्ञ, पद्मभूषण दिवंगत माधवराव धनंजयराव गाडगीळ यांना मरणोत्तर प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार त्यांची कन्या सौ. गीता शहा आणि जावई किरण शहा यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. रुपये एक लाख आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
पद्मभूषण दिवंगत माधवराव गाडगीळ यांचे महान कार्य
कै. माधवराव गाडगीळ हे थोर भारतीय पर्यावरणशास्त्रज्ञ, लेखक आणि ‘पर्यावरण विज्ञान केंद्रा’चे (CES) संस्थापक होते. निसर्ग संवर्धनातील त्यांचे कार्य अत्यंत मोलाचे आहे:
-
लोकसंख्या जीवशास्त्र, संवर्धन जीवशास्त्र, मानवी पर्यावरणशास्त्र आणि पर्यावरणीय इतिहास या क्षेत्रांत त्यांनी व्यापक संशोधन केले.
-
परिसंस्थेचा एक महत्त्वाचा भाग म्हणून मानवांचा समावेश करण्याच्या दृष्टिकोनाला त्यांनी ओळख मिळवून दिली.
-
१९८० च्या दशकातील त्यांच्या सुरुवातीच्या संशोधनामुळे ‘निलगिरी’ची भारतातील पहिले ‘जैवमंडळ राखीव’ (Biosphere Reserve) म्हणून ओळख पटण्यास मोठी मदत झाली.
-
‘जैविक विविधता कायदा २००२’ तयार करण्यातही त्यांचा सिंहाचा वाटा होता.
-
पश्चिम घाटाचे सखोल संशोधन करून, तेथील पर्यावरण रक्षणासाठी त्यांनी शासनाला अत्यंत महत्त्वाचे मार्गदर्शन केले होते. त्यांच्या याच अद्वितीय कार्यासाठी भारत सरकारने त्यांना ‘पद्मभूषण’ पुरस्काराने गौरविले होते.
पर्यावरण आणि परिसंस्था संवर्धनाच्या क्षेत्रातील त्यांच्या या अतुलनीय आणि प्रशंसनीय योगदानाबद्दल कृतज्ञता व आदर व्यक्त करण्यासाठी, चिरमुले ट्रस्टतर्फे त्यांना मरणोत्तर २०२५ चा ‘चिरमुले पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले.
चिरमुले पुरस्काराची भव्य परंपरा
चिरमुले ट्रस्टने यापूर्वी डॉ. मनमोहन सिंग, डॉ. विजय भटकर, डॉ. अनिल काकोडकर, कै. रतन टाटा, कै. राहुल बजाज, डॉ. सी. रंगराजन, ज्येष्ठ कवी गुलजार, डॉ. सायरस पूनावाला, डॉ. राजेंद्रसिंह, डॉ. हिम्मतराव बावस्कर, नाम फाउंडेशन आदी आदरणीय व्यक्ती व संस्थांना या पुरस्काराने सन्मानित केले आहे.
मान्यवरांची उपस्थिती
पुरस्कार प्रदान करतेवेळी कै. माधव गाडगीळ यांचे जावई किरण शहा आणि कन्या सौ. गीता शहा उपस्थित होत्या. तसेच ट्रस्टचे विश्वस्त डॉ. अच्युत गोडबोले, श्री. समीर जोशी, आयडीबीआय (IDBI) ट्रस्टीतर्फे सौ. मानसी माचवे, सौ. मानसी पतकी आणि गाडगीळ कुटुंबीयांचे स्नेही रमण वेलणकर यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.

