वांग खोऱ्यात बहरली काश्मीरची सफरचंद! मानेगावच्या पिता-पुत्राचा १० गुंठ्यांत यशस्वी प्रयोग; शेतकऱ्यांसाठी ठरतोय दिशादर्शक


 पाटण तालुक्यातील मानेगाव येथे प्रगतशील शेतकरी अधिकराव माने व त्यांचा मुलगा विजय माने यांनी १० गुंठ्यांत सफरचंदाची बाग यशस्वीपणे फुलवली आहे. ‘हार्मोन ९९’ जातीच्या या सफरचंदांना मुंबई मार्केटमधून मोठी मागणी मिळत आहे.

 स्थैर्य,  सातारा, दि. २६ : आंबे, फणस, काजू, चिकू यांसारख्या फळांसह जांभूळ, करवंद, तोरणे असा डोंगरचा रानमेवा पिकणाऱ्या वांग खोऱ्यात आता थेट ‘सफरचंदाची बाग’ बहरली आहे. मानेगाव (ता. पाटण) येथील प्रगतशील शेतकरी अधिकराव माने आणि त्यांचे पुत्र विजय माने यांनी माळरानावरील दहा गुंठ्यांत सफरचंदाची बाग यशस्वीपणे फुलवून एक नवा आदर्श निर्माण केला आहे. काश्मीर आणि हिमाचल प्रदेशात पिकणारी सफरचंद आता ढेबेवाडी खोऱ्याच्या मातीची मधुर चव घेऊन बाजारात दाखल झाली आहेत.

कुटुंबीयांची साथ आणि नवा धाडसी प्रयोग

अधिकराव माने यांचे शेतीतील नवनवीन प्रयोग अन्य शेतकऱ्यांसाठी नेहमीच दिशादर्शक ठरले आहेत. आता त्यांची दुसरी पिढीही शेतीत उतरली असून, मुलगा विजय स्वतःचा औषध विक्रीचा व्यवसाय सांभाळून वडिलांना शेतीत नवनवीन प्रयोग करण्यासाठी खंबीर साथ देत आहे. या प्रयोगात सून पूजा, बंधू सुभाष आणि संपूर्ण माने कुटुंबीयांची मोलाची साथ लाभली. पाटण तालुक्यातील सफरचंद लागवडीचा हा पहिलाच आणि यशस्वी प्रयोग ठरला आहे.

असे केले लागवडीचे काटेकोर नियोजन

सफरचंदाच्या बागेसाठी माने कुटुंबीयांनी अत्यंत नियोजनबद्ध पावले उचलली:

  • जातीची निवड: दोन वर्षे वयाची ‘हार्मोन ९९’ (HRMN-99) या उष्ण वातावरणात तग धरणाऱ्या जातीची १७० रोपे आणण्यात आली.

  • खड्डे व खत व्यवस्थापन: मे महिन्यामध्ये ३ बाय ३ आकाराचे खड्डे काढून त्यात ३५ ट्रॅक्टर-ट्रेलर बंधाऱ्यातील गाळ भरण्यात आला. प्रत्येक खड्ड्यात दोन पाटी शेणखत, तसेच लागवडीच्या वेळी सुफला व बुरशीनाशक पावडरचा वापर करण्यात आला.

  • लागवड अंतर: ८ बाय १० फुटांच्या अंतरावर रोपांची लागवड करण्यात आली.

  • मार्गदर्शन: या प्रयोगासाठी त्यांना काटेवाडी (ता. माण) येथील जालिंदर दडस, कालवडे कृषी विज्ञान केंद्र आणि शासनाच्या कृषी विभागाचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

एका झाडाला ७० फळे; दुप्पट उत्पन्नाचा विश्वास

पाण्याचे आणि सेंद्रिय खतांचे योग्य नियोजन, वेळेवर फवारण्या आणि योग्य देखभाल यामुळे सध्या त्यांची बाग रसदार सफरचंदांनी बहरली आहे. विशेष म्हणजे एका झाडाला सत्तरहून अधिक फळे लागली आहेत. आतापर्यंत या बागेसाठी सुमारे दीड लाख रुपये खर्च आला असला, तरी खर्च वजा जाता यातून दुप्पट उत्पन्न सहज मिळेल, असा ठाम विश्वास माने कुटुंबीयांनी व्यक्त केला आहे. सध्या या सफरचंदांना स्थानिक बाजारपेठेसह मुंबई मार्केटमधूनही मोठी मागणी असून चांगला दर मिळत आहे.

“सफरचंद हे प्रामुख्याने काश्मीर-हिमाचल या थंड प्रदेशातील फळ आहे. या फळबागेची आपल्या परिसरात लागवड करून त्याचे उत्पन्न घेण्याचा हा एक धाडसी प्रयोग होता. तो आज यशस्वी झाल्याचे मोठे समाधान वाटत आहे.”

– विजय माने (शेतकरी, मानेगाव)


Back to top button
Don`t copy text!