फलटण: गजानन चौकात कोयता गँगचा राडा – पोलीस कारवाईकडे लक्ष

फलटण शहरातील गजानन चौकात कोयता घेऊन आलेल्या टोळक्याने एका बंद दुकानासमोर गोंधळ घालत वाहनाची काच फोडल्याने दहशत पसरली आहे.

स्थैर्य, फलटण, दि. २८ जुलै : फलटण शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या गजानन चौकात कोयता हातात घेऊन आलेल्या काही तरुणांच्या टोळक्याने बंद दुकानासमोर राडा घातला. दुकान बंद असल्याने आणि स्थानिक नागरिकांची गर्दी होऊ लागल्याने या टोळक्याने पळ काढला, मात्र जाताना त्यांनी एका चारचाकी वाहनाची मागची काच फोडून नुकसान केले.

शहरात घबराटीचे वातावरण

काही महिन्यांपूर्वी फलटण शहरातील जिंती नाका परिसरातील एका सलूनमध्ये अशाच प्रकारे कोयता गँगने दहशत माजवली होती. आता पुन्हा भरवस्तीत आणि शहराच्या मध्यवर्ती गजानन चौकात घडलेल्या या घटनेमुळे व्यापारी आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

पोलीस प्रशासनाच्या भूमिकेकडे लक्ष

गल्लीबोळात आणि मुख्य चौकात कोयत्यासारखी प्राणघातक हत्यारे घेऊन उघडपणे फिरणाऱ्या या गुंड प्रवृत्तीच्या तरुणांवर वचक बसवण्यात पोलीस अपयशी ठरत असल्याची चर्चा नागरिक करत आहेत. याप्रकरणी फलटण शहर पोलीस स्टेशन कोणती कठोर भूमिका घेणार आणि जिल्हा पोलीस प्रमुख या दहशतीचा बिमोड करण्यासाठी ठोस पावले उचलणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Back to top button
Don`t copy text!