फलटण: नीरा व कृष्णा खोऱ्यातील धरणांत मोठा साठा

फलटण तालुक्यासाठी महत्त्वाच्या असणाऱ्या वीर, भाटघर, नीरा देवघर, गुंजवणी व धोम बलकवडी धरणांमध्ये पाणीसाठा वेगाने वाढला असून वीर धरण १०० टक्के भरले आहे.

स्थैर्य, फलटण, दि. २८ जुलै : फलटण तालुक्याला सिंचन आणि पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणाऱ्या नीरा व कृष्णा खोऱ्यातील प्रमुख धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाने जोरदार हजेरी लावल्याने पाणीसाठ्यात समाधानकारक वाढ झाली आहे. वीर धरण १०० टक्के पूर्ण भरले असून, नीरा नदीपात्रासह डाव्या व उजव्या कालव्यातून विसर्ग सुरू आहे.

वीर धरण पूर्ण भरले, विसर्ग सुरू

जलसंपदा विभागाने प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार, ९.४१ टीएमसी क्षमता असणारे वीर धरण १०० टक्के भरले आहे. धरणाच्या सांडव्यावरून नीरा नदीपात्रात ४,६३७ क्युसेक, डाव्या कालव्यात ८२७ क्युसेक, तर उजव्या कालव्यात १,५५० क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. याशिवाय अतिवाहकाद्वारे (इस्केप) १,१०० क्युसेक पाणी सोडण्यात येत आहे.

नीरा खोऱ्यातील प्रमुख धरणांची स्थिती

नीरा प्रणालीतील इतर प्रमुख धरणांमध्येही मुबलक पाणीसाठा जमा झाला आहे. भाटघर धरणात १९.९९ टीएमसी (८५.०७ टक्के) उपयुक्त साठा झाला असून २४ तासांत ११ मि.मी. पाऊस पडला आहे. नीरा देवघर धरणात १०.६४ टीएमसी (९०.६९ टक्के) साठा उपलब्ध झाला असून तेथे ४७ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. गुंजवणी धरण ८५.०२ टक्के (३.१४ टीएमसी) भरले असून तेथून कानंदी नदीपात्रात ६१८ क्युसेक व पॉवर हाऊसद्वारे २५० क्युसेक विसर्ग सुरू आहे.

धोम बलकवडी धरणात ८६ टक्के साठा

कृष्णा खोऱ्यातील फलटणसाठी महत्त्वाच्या असणाऱ्या धोम बलकवडी धरणात ३.४४ टीएमसी म्हणजेच ८६.७८ टक्के उपयुक्त पाणीसाठा जमा झाला आहे. धरण क्षेत्रात ४८ मि.मी. पावसाची नोंद झाली असून जललक्ष्मी बोगद्याद्वारे ३३० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरू असल्याने धरणांमधील आवक वाढली आहे. नीरा नदीकाठच्या व कालवा परिसरातील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

Back to top button
Don`t copy text!