दैनिक स्थैर्य | दि. १९ एप्रिल २०२४ | फलटण |
फलटण शहरातून सन २०२२ पासून आत्तापर्यंत अनेक नागरिकांचे मोबाईल फोन गहाळ किंवा हरविल्याच्या घटना घडल्या होत्या. त्यातील १५ मोबाईल फोन फलटण शहर पोलिसांनी शोधून ते मोबाईल त्या त्या व्यक्तीकडे परत फलटणचे उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आले आहेत. या १५ मोबाईल फोनची किंमत सुमारे रू. २,५०,०००/- आहे.
हे हरविलेले मोबाईल फोन शोधून हस्तगत करण्यामध्ये फलटण शहर पोलीस ठाण्याचे पो.शि. स्वप्निल खराडे यांनी विशेष कामगिरी केली आहे. या मोहिमेत त्यांना सायबर पोलीस ठाणे, सातारा येथील पोलीस अंमलदारांचे मोलाचे सहकार्य लाभले.
पोलिसांच्या या कामगिरीचे नागरिकांनी कौतुक केले असून यापुढेही अशीच कामगिरी फलटण शहर पोलिसांकडून करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.