फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीची मतमोजणी प्रक्रियेला सुरुवात झाली असून काही वेळातच पहिला निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे. मतमोजणी व निकाल जाहीर झाल्यानंतर कोणताही अनुसूचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस उपअधीक्षक तानाजी बरडे यांच्या मार्गदर्शनाखाली फलटण पोलीस प्रशासन बाजार समितीच्या आवारामध्ये तैनात झालेले आहे.
निवडणूक निर्णय अधिकारी सुनील धायगुडे व तहसीलदार समीर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीची मतमोजणी प्रक्रिया संपन्न होत आहे.
बाजार समितीची मतमोजणी प्रक्रिया ही 12 टेबलवर विविध मतमोजणी केंद्रातील मते मोजण्यात येत आहेत. त्यामुळे निकाल जाहीर होण्यास फारसा अवधी लागणार नाही अशीही चर्चा मतमोजणी केंद्रावर सुरू आहे.
फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीवर विधान परिषदेचे माजी सभापती व विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत श्रीराम पॅनलने चार जागा बिनविरोध करत आपला विजयाचा नारळ फोडलेला होता. बाजार समितीवर गेल्या काही वर्षांपासून श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्याच गटाची सत्ता आहे. या निवडणुकीमध्ये सुद्धा सत्तांतर होईल असे चित्र दिसून येत नाही.