फलटण: रणजितदादांच्या नेतृत्वात अविनाश खलाटे यांचा भाजपमध्ये प्रवेश; राजे गटाला मोठा धक्का

सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी संचालक अविनाश खलाटे यांचा रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली भाजपमध्ये प्रवेश. यामुळे गटाची ताकद वाढली.

स्थैर्य, फलटण, दि. १८ जुलै : सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी संचालक आणि निवृत्त विभागीय व्यवस्थापक अविनाश खलाटे यांनी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आहे. या महत्त्वपूर्ण प्रवेशामुळे फलटण तालुक्यात खासदार गटाची ताकद कमालीची वाढली आहे.

यावेळी स्वराज नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन अभिजीत नाईक निंबाळकर, भारतीय जनता पार्टीचे फलटण कोरेगाव विधानसभा प्रमुख अमित रणवरे यांच्यासह खुंटे व परिसरातील भारतीय जनता पार्टीचे प्रमुख पदाधिकारी व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अविनाश खलाटे हे सध्या खुंटे विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीचे चेअरमन म्हणून कार्यरत आहेत. यापूर्वी त्यांनी सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत विभागीय विकास अधिकारी आणि कार्यलक्षी संचालक म्हणून महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. तसेच, बँक एम्प्लॉईज युनियनचे ते माजी उपाध्यक्ष राहिले आहेत. सहकार क्षेत्रातील त्यांचा मोठा अनुभव पक्षासाठी जमेची बाजू मानली जात आहे.

अविनाश खलाटे यांच्यासोबत परिसरातील अनेक नेत्यांनीही भाजपचा झेंडा हाती घेतला. यामध्ये खुंटे विकास सेवा सोसायटीचे संचालक सुधाकर माने, माजी चेअरमन चंद्रकांत खलाटे, युवा नेते सोमनाथ खलाटे, खुंटेचे माजी उपसरपंच महेश माने आणि शिंदेवाडी ग्रामपंचायतीचे माजी सदस्य गोपीचंद जाधव यांचा समावेश आहे.

सहकार क्षेत्रात दबदबा असलेल्या खलाटे यांच्यासह स्थानिक नेत्यांनी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत भाजपमध्ये प्रवेश केल्याने, आगामी काळात स्थानिक पातळीवर खासदार गटाचे वर्चस्व आणखी वाढण्याची चिन्हे आहेत.

Back to top button
Don`t copy text!