फलटण पंचायत समितीच्या नव्या ‘८ मजली’ इमारतीसाठी २७ कोटींचा निधी मंजूर; रणजितदादांच्या एका फोन कॉलवर ग्रामविकास मंत्री गोरेंची ऐतिहासिक भेट!

स्थैर्य, फलटण, दि. १८ जुलै : फलटण पंचायत समितीच्या नव्या, भव्य आणि सुसज्ज इमारतीसाठी माढा लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी तब्बल २७ कोटी रुपयांचा भरघोस निधी मंजूर करून आणला आहे. यापैकी पहिल्या टप्प्यातील कामकाजासाठी सुमारे १५ कोटी रुपयांचा निधी लवकरच उपलब्ध होणार असल्याची अत्यंत माहिती फलटण पंचायत समितीच्या सभापती कु. शिवांजली विक्रमसिंह भोसले यांनी दिली आहे.

पदग्रहण समारंभातील ‘तो’ फोन कॉल ठरला निर्णायक!

काही महिन्यांपूर्वी पार पडलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांनंतर, फलटण पंचायत समितीच्या सभापतीपदी भारतीय जनता पार्टीच्या कु. शिवांजली भोसले या विराजमान झाल्या. त्यांच्या या पदग्रहण समारंभावेळीच माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी थेट राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांना फोन लावला होता. पंचायत समितीच्या सभागृहाची व जुन्या इमारतीची झालेली दुरावस्था दादांनी थेट मंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली. “आता पंचायत समितीत भारतीय जनता पार्टीचा सभापती विराजमान झाला असल्याने, आम्हाला हक्काने जादा निधी मिळाला पाहिजे,” अशी जोरदार मागणी दादांनी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे केली होती. यानंतर मंत्रालय स्तरावर सातत्यपूर्ण पाठपुरावा करून अखेर त्यांनी या मोठ्या निधीला मंजुरी मिळवून घेतली आहे.

विखुरलेल्या विभागांना मिळणार एकाच छताखाली हक्काची वास्तू

सध्याची फलटण पंचायत समितीची इमारत अतिशय जुनी आणि अपुरी पडत आहे. यामध्ये कोणत्याही विभागाला सुसज्ज आणि पुरेशी जागा उपलब्ध नाही. परिणामी, पंचायत समितीचे विविध विभाग हे शहरात इतरत्र विखुरलेले असून वेगवेगळ्या ठिकाणांहून त्यांचे कामकाज चालते. नागरिकांची आणि प्रशासनाची ही गैरसोय ओळखूनच रणजितदादांनी या नव्या भव्य इमारतीचा प्रस्ताव शासनाकडे रेटून धरला होता.

कशी असेल पंचायत समितीची नूतन इमारत? (राज्यातील एक आगळीवेगळी संकल्पना)

मंजूर झालेली पंचायत समितीची ही नूतन इमारत तब्बल ८ मजली असणार आहे. या इमारतीची रचना संपूर्ण राज्यासाठी एक ‘रोल मॉडेल’ ठरणार आहे:

स्वतंत्र आणि सुसज्ज दालने: यामध्ये जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या अखत्यारीत येणाऱ्या प्रत्येक प्रशासकीय विभागाला स्वतंत्र आणि सुसज्ज अशी दालने उपलब्ध करून दिली जाणार आहेत. त्यामुळे नागरिकांची कामे एकाच छताखाली आणि वेगाने होतील.

संघटनांसाठी हक्काचे ऑफिस: राज्यामध्ये अशी संकल्पना कुठेही पाहायला मिळणार नाही, पण या नव्या इमारतीमध्ये पंचायत समितीच्या अखत्यारीतील ग्रामसेवक संघटना, शिक्षक संघटना आणि कर्मचारी संघटना यांच्यासाठी सुद्धा स्वतंत्र कार्यालये (Offices) असणार आहेत.

ग्रामसेवकांसाठी विशेष सुविधा: तळागाळात आणि गावोगावी जाऊन काम करणाऱ्या ग्रामसेवकांना पंचायत समितीत आल्यावर हक्काची जागा मिळावी, यासाठी त्यांच्या बसण्याची आणि विश्रांतीची एक अत्यंत सुसज्ज व स्वतंत्र व्यवस्था या इमारतीत करण्यात येणार आहे.

रणजितदादांच्या या दूरदृष्टीच्या निर्णयामुळे आणि भक्कम पाठपुराव्यामुळे फलटण पंचायत समितीचा प्रशासकीय चेहरामोहरा लवकरच बदललेला पाहायला मिळणार आहे.

Back to top button
Don`t copy text!